
अशोकजी, आपण हवे होतात !
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 9 |
मी स्वतः कारसेवक या नात्याने 2 नोव्हेंबर 1990 चा अयोध्येतील नरसंहार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. डोक्यावरचे केस काढून टक्कल केलेल्या आणि वेषांतर करून आलेल्या साध्वी उमा भारती एका तुकडीसह हनुमान गढी पार करून श्रीरामजन्मभूमीच्या दिशेने कूच करीत होत्या. त्या मागे असलेल्या तुकडीत आम्ही अमरावतीकर होतो. अश्रूधुराच्या नळकांड्यांचा बेछूट वर्षाव केल्यावर गोळीबाराचे तांडव सुरू झाले. दिसेल त्याला लाठयांनी बडवले जात होते. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे महानायक अशोकजी सिंघल स्वतः गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात लाठी मारली गेली होती. भळाभळा रक्त वाहत होते. अशोकजी जखमी झाल्याची वार्ता समजताच त्यांच्यावर अपार प्रेम करणारे आणि श्रीरामलला प्रगटले त्या 1849 सालापासून आघाडीवर असलेले दिगंबर आखाड्याचे वयोवृद्ध महंत बाबा परमहंस रामचंद्रदास यांच्या विशेष पथकाने अशोकजींचे प्राण वाचवले. नाहीतर अनर्थ घडला असता! दुपारपर्यंत अयोध्येचे रूपांतर मसनवटात झाले होते. शरयुत सापडणारी प्रेते, रक्तबंबाळ युवक, सर्वत्र आक्रोश होता. अयोध्या सुन्न होती. शेकडो मठांमध्ये वातावरण सुन्न होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व कारसेवक मणिराम छावणीत एकवटले. महंत नृत्यगोपालदास, महंत रामचंद्रदास यांच्यासह अनेक दिगग्ज संत उपस्थित होते. डोक्यावर पट्टी बांधलेले अशोकजी आले आणि सर्वांना धीर आला. अशोकजींनी अतिशय सुरेल स्वरात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यासह विविध प्रकारच्या रामधून बराच वेळ पर्यंत सर्वांकडून म्हणवून घेतली. नेहमी अतिशय आक्रमकपणे हिंदुत्व मांडणारे, राष्ट्रीय अस्मिता जगवण्यासाठी अमोघ वक्तृत्वाचा वापर करणारे अशोकजी मला त्या दिवशी वेगळेच भासत होते. त्यांच्या स्वरातील कारुण्य, ममत्व प्रकर्षाने जाणवत होते. मी तल्लीनतेने अशोकजींना न्याहाळत होतो. हा महानायक प्रचंड व्यथित होता. आंदोलनात गमावलेला एकेक चेहरा त्यांच्या डोळ्याआड होत नव्हता. असंख्य कारसेवकांना झालेल्या जखमा त्यांच्या हृदयावर खोलपर्यंत घाव करून गेल्या होत्या. त्यांचे हृदय आक्रोशत होते. आत ज्वालामुखी प्रदीप्त होता, असे मला भासत होते.
शब्दांना कर्तृत्वाची साथ मिळाली की त्याचे मंत्र होतात. अशोकजींच्या मुखातून येणाऱ्या या मंत्रांची ताकद काही वेगळीच जाणवत होती. अशोकजींनी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतलेले होते. पण आजची गायकी प्रत्येक रामभक्तांच्या हृदयाचा थेट ताबा घेणारी होती. मुलायमसिंह असो की केंद्रातील काँग्रेसचे सरकार असो यांनी सांडवलेल्या रामभक्तांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब द्यावाच लागणार, याची खात्री अशोकजींच्या संयमित, संतुलित आणि भावपूर्ण भाषणाने मनोमन पटली.
अशोकजी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट होते. देशाच्या काना कोपऱ्यातील संत महंतांना त्यांच्यातील सर्व भेद, रुसवे फुगवे, मानापमान बाजूला सारत त्यांनी एकत्र आणले होते. भगवे वस्त्र धारण केले नसले तरी उच्च कोटीच्या ऋषींसारखी त्यांची कठोर तपश्चर्या होती. भारताच्या सर्व भागातील संत अशोकजींचा शब्द प्रमाण मानत होते. श्रीराम मंदिराची एकेक वीट चढत असताना समर्थ आणि संघटित भारताची वीट पण रचली जावी, हे ध्येय होते. भारतमातेला परम वैभवाला नेण्यासाठी संकल्प केलेले ते एक समर्पित जीवन होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केलेले अशोकजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले आणि आपले संपूर्ण जीवन त्यांनी संघाकार्याला वाहून दिले. ते संघाचे प्रचारक बनले. श्रीमती इंदिरा गांधींनी लावलेल्या आणिबाणीच्या विरोधात झालेल्या संघर्षात ते आघाडीवर होते. 1980 साली संघाने अशोकजींकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी सोपवली.
1981 साली मीनाक्षीपुरम येथे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले. मंदिरांमध्ये प्रवेश मिळत नाही, ही या भागातील मागासवर्गीय समुदायांची मुख्य तक्रार होती. अशोकजींनी विहिंपच्या वतीने या भागात 200 मंदिरे बांधली. कोण्याही हिंदू बांधवाला मंदिरात प्रवेशापासून वंचित ठेवता कामा नये यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली. त्यानंतर 1984 साली दिल्लीला झालेल्या धर्मसंसदेत श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा शंखनाद झाला.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी विषयक निकाल दिला तेव्हा सर्वात कोणाची उणीव भासली असेल तर ती या महानायकाची. 2015 साली अशोकजी गेले. ते आता हवे होते. अखेरच्या क्षणापर्यंत अशोकजी हिंदुत्वासाठी काम करत होते. श्रीरामजन्मभूमी वर भव्य मंदिर व्हावे हाच त्यांचा ध्यास होता. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा विशाल वृक्ष करण्यासाठी जे जे झटले त्यातला अशोकजी हा माझ्या पिढीने पाहिलेला कर्तृत्वसंपन्न अध्याय होता.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827