Home MAHARASHTRA संजय परब, शरद कद्रेकर यांना पुरस्कार!

संजय परब, शरद कद्रेकर यांना पुरस्कार!

0

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून
प्रतिष्ठेचे क्रीडा पुरस्कार जाहीर

 

 

मुंबई (MUMBAI) : ज्येष्ठ पत्रकार संजय परब आणि शरद कद्रेकर यांना क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदानाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ सन्मानासाठी निवड झाली आहे.
‘महेश बोभाटे‘ आणि आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती पुरस्कार’ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागात दीर्घ आणि प्रभावी क्रीडा पत्रकारिता करणारे संजय परब, शरद कद्रेकर यांची या पुरस्कारांसाठी निवड करत मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर एबीपी माझाचे विजय साळवी आणि पुण्यनगरीचे सुभाष हरचेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रोख १०,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

युवा पत्रकारांसाठीचे २०२० ते २०२४ या पाच वर्षांचे ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ अनुक्रमे सामनाचे मंगेश वरवडेकर, नवशक्तीचे तुषार वैती, लोकमत डिजिटलचे प्रसाद लाड, सकाळचे जयेंद्र लोंढे आणि लोकमतचे रोहित नाईक यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख ७,००० रुपये असे आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.

‘कोविड काळापासून विविध कारणांमुळे हे पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते. यंदा मात्र पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे या दिग्गज पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. राज्य आणि राष्ट्रीय क्रीडाविश्वात या पत्रकारांनी दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे,’ असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.