वर्धा: शेतमालाला भाव मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढविणारी बातमी आहे. विदर्भासह राज्यात पुढील चार दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यापूर्वीच निसर्गाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातीली हिंगणघाट तालुक्यातील मानकापूर येथे शेतशिवारात वीज पडून चौघे जखमी झाले. दिनेश इवनठरे, सुनील अवतरे, मुरलीधर राऊत व गौरव पुरके अशी जखमींची नावे आहेत. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच घटनेत आणखी चारजण किरकोळ जखमी असल्याचेही सांगितले जाते. आता आणखी पुढील चार दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे ठरणार आहे. हातातोंडाशी आलेला घात अवकाळीमुळे हिरावला जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गाच्या जिवाला घोर लागला आहे.
खरीप हंगामात शेतीचे मोठे नुसकान झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामातील पिकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, अवकाळी पावसाच्या शक्यतेने चिंतेचे मळभ पुन्हा दाटून आले आहे. त्यात मानकापुरातील घटनेने शेतकऱ्यांची धाकधूक अधिकच वाढविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेत शिवारात आठ जण शेतातील कामे करीत होते. सायंकाळी वातावरणात अचानक बदल होत विजांचा कडकडाट सुरू झाला. अशातच वीज पडून चौघे जखमी झाले. तर चौघांना किरकोळ दुखापत झाली. वीज पडून चौघांना गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वडनेर पोलिसांना माहिती देऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती या चारही जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात रेफर केले. तर किरकोळ जखमींना तपासणीअंती रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वीज पडून चौघे जखमी झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांची गर्दी बाजूला सारत घटने बाबतची अधिकची माहिती जाणून घेतली. अशा घटना टाळण्यासाठी पुढील चार दिवश शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.