बुलढाणा – आरोग्य विभागाने गोरगरिबांना रात्री उशिरापर्यंत मोफत उपचार मिळावेत, या हेतूने 1 मे पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू राहणार असून, या ठिकाणी 147 आरोग्य तपासण्या आणि मोफत औषधोपचार केला जाणार आहेत. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरू करण्यात आला असून, एकूण 32 दवाखाने सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
राज्यात 15 व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यानुसार 13 ही तालुक्यात महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तालुका स्तरावर हे दवाखाने सुरू करण्यात आले असून, त्यांची संख्या सध्या 13 आहे. मात्र, जागा निश्चित झाल्यानंतर 32 ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे.