बापरे … एकट्या चंद्रपुरात 98 वाघ-बिबट्यांचा मृत्यू

0
बापरे ... एकट्या चंद्रपुरात 98 वाघ-बिबट्यांचा मृत्यू
bapre-98-tigers-and-leopards-died-in-chandrapur-alone

तर वन्यजीवांच्या हल्ल्यात 145 जणांनी गमावला जीव

चंद्रपुर (Chandrapur) :- जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाघांची संख्या, त्यांना कमी पडत असलेला अधिवास आणि जंगलात होणारे अतिक्रमण यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील चार वर्षांत तब्बल 98 वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यू झाला तर वन्यजीवांच्या हल्ल्यात आतापर्यंत 145 जणांना जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हा हा जंगलाच्या दृष्टीने चार विभागांत विभागलेला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्य चांदा या चार विभागांत 2021 ते 2024 दरम्यान जिल्ह्यात 98 वाघ-बिबट्याचा मृत्यू झाला असून, यात 59 वाघ तर 39 बिबट्याचा समावेश आहे.

नैसर्गिकरीत्या किंवा अधिवास मिळवण्यासाठी दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू : बऱ्याचदा या हिंस्त्र प्राण्यांचा नैसर्गिकरीत्या किंवा अधिवास मिळवण्यासाठी दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू होतो, तर कधी वन्यजीवांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी जिवंत विद्युततारांचा प्रवाह सोडला जातो, यातदेखील अशा प्राण्यांचा मृत्यू होतो. 2021 मध्ये एकूण 12 वाघ आणि 13 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 4 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 3 अशा 12 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 6, ब्रह्मपुरी 4, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे 2 अशा 13 बिबट्यांचा समावेश आहे. 2022 मध्ये ही संख्या कमी झाली. या वर्षात जिल्ह्यात 12 वाघ आणि 7 बिबट्यांचा मृत्यू झाला. यामध्ये चंद्रपूर विभागात 3, ब्रह्मपुरी 2, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 4 अशा 12 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 3, ब्रह्मपुरी 3, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 7 बिबट्यांचा समावेश आहे.

वन्यजीवांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी वाढ : 2023 मध्ये वन्यजीवांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी वाढ झालीय. या वर्षात 27 वाघ आणि 14 बिबट्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये चंद्रपूर विभागात 9, ब्रह्मपुरी 6, मध्य चांदा 10 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 2 अशा 27 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 7, मध्य चांदा 2 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 1 अशा 14 बिबट्यांचा समावेश आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 8 वाघ आणि 5 बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. यात चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 8 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 2, ब्रह्मपुरी 2, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 5 बिबट्यांचा समावेश आहे.

वन्यजीवांच्या हल्ल्यात चार वर्षांत 145 जणांचा मृत्यू : 2021 ते 2024 या चार वर्षांत वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल 145 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. यात एकट्या वाघाच्या हल्ल्यात 123 नागरिकांचा जीव गेलाय. बिबट्याच्या हल्ल्यात 17, रानडुकरांच्या हल्ल्यात 4 आणि हत्तीच्या हल्ल्यात एका जीवास मुकावे लागले. 2021 मध्ये जिल्ह्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात 43 जणांचा मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात 34, बिबट्या 6, रानडुक्कर 2 आणि एका जणाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 8, ब्रह्मपुरी 13, मध्य चांदा 4 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 9 अशा 34 नागरिकांचा समावेश आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात एकट्या चंद्रपूर विभागात 6 जणांचा मृत्यू झालाय.

तर 7 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू : 2022 मध्ये एकूण 51 जणांचा मृत्यू झाला. यात 44 जणांचा वाघाच्या हल्ल्यात तर 7 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 12, ब्रह्मपुरी 23, मध्य चांदा 0 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 9 अशा 44 जणांचा समावेश आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 7 नागरिकांचा समावेश आहे. 2023 मध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झालाय. यात वाघाच्या हल्ल्यात 21, बिबट्या 3 आणि रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा समावेश आहे. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 5, ब्रह्मपुरी 9, मध्य चांदा 0 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 7 अशा 21 जणांचा मृत्यू झाला. तर बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर वनविभागात 3 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात 24, बिबट्याच्या हल्ल्यात 1 आणि रानडुक्कराच्या हल्ल्यात 1 जणाला जीव गमवावा लागला. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 5, ब्रह्मपुरी 8, मध्य चांदा 5 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 6 अशा 24 जणांचा समावेश आहे. चंद्रपूर विभागात बिबट्याच्या हल्ल्यात 1 आणि रानडुक्कराच्या हल्ल्यात 1 जणाचा मृत्यू झाला.

ब्रह्मपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्ष सर्वाधिक: चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न हा ब्रह्मपुरी विभागात आहे. तसेच दिवसेंदिवस हा प्रश्न आणखीनच गंभीर होत आहे. या परिसरात जंगल हे सलग नसून विखुरलेले आहे, तर मध्ये अनेक ठिकाणी मानवी वस्ती आणि शेती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि नागभीड या तालुक्यांचा समावेश होतो. या भागात वाघांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे, त्यामुळे वाघांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील येथे चिंताजनक आहे. शेतात जाणारे मजूर, शेतकरी आणि गुराख्यांचा मृतांच्या संख्येत सर्वाधिक समावेश आहे.
2021 ते 2024 दरम्यान 145 जणांचा मृत्यू झालाय. यात एकट्या ब्रह्मपुरी वनविभागात 54 जणांचा मृत्यू झाला.

वाघांना स्थलांतरित करण्याची वाट बघतोय- मुख्य वनसंरक्षक : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्षदेखील मोठा आहे. त्यामुळे वाघांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही अशा वाघांसाठी प्रस्ताव येण्याची वाट बघतोय. आतापर्यंत आम्ही पाच वाघांचे यशस्वीपणे स्थलांतर केलंय. यामध्ये 3 वाघ नागझिरा अभयारण्यात तर 2 वाघ हे नुकतेच ओडिशा राज्यात पाठवलेत. हे वाघ हे तंदुरुस्त असायला हवेत शिवाय तो वाघ नरभक्षक किंवा आणखी काही समस्यांनी ग्रस्त नसावा, असा प्रस्ताव आल्यास आम्ही नक्कीच त्याचे स्वागत करू. अशी प्रतिक्रिया चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिलीय.

एआय उपक्रमाचा अभ्यास अंतिम टप्प्यात : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील मोहर्ली वनपरिक्षेत्रात एआयवर आधारित प्रयोग सुरू करण्यात आलाय. या उपक्रमाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केले होते. यामध्ये हिंस्र प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 12 गावांत 60 कॅमेरे लावण्यात आलेत. या परिसरात वाघ, बिबट किंवा अस्वल आल्यास लगेच त्याची ओळख केली जाऊन या परिसरात धोक्याचा इशारा दिला जातो. हा हिंस्र प्राणी कोणता आहे त्याचा परिसर कुठला आहे याची नेमकी माहिती मिळते. त्यामुळे धोक्याचा इशारा या परिसरात दिला जातो. त्यामुळे नागरिक सावध होतात. या माध्यमातून मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत मिळत आहे. हा प्रयोग आता अंतिम टप्प्यात असून नागपूर येथील व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) येथील तज्ज्ञ लोकांची चमू यावर अभ्यास करीत आहे. यावर संपूर्ण अभ्यास केल्यावर याबाबतच्या अहवाल 15 ते 20 दिवसांत देण्यात येणार आहे. या आधारावर या प्रयोगाचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. तो करायचा असल्यास मोठी यंत्रणा आवश्यक असणार आहे आणि त्यासाठी मोठ्या निधीची देखील आवश्यकता भासणार आहे. सध्या या प्रयोगासाठी सीएसआर निधीतून अर्थपुरवठा होतो आहे. मात्र याचा विस्तार करण्यास वन खात्याकडून निधी मिळण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही डॉ. रामगावकर म्हणाले.

वाघांचे स्थलांतर हाच योग्य पर्याय- सुरेश चोपणे : वाघांची संख्या ही वाढत आहे आणि भविष्यातदेखील ती वाढतच जाणार आहे. याबाबत नागरिक अजूनही उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्ष हा वाढत चालला आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या घटना ह्या सर्वाधिक जंगलात गेल्यामुळे झालेल्या आहेत. त्या थांबविण्यासाठी वाघांचे स्थलांतर करणे हा प्रभावी पर्याय आहे. जे नरभक्षक झालेले वाघ आहेत किंवा मानवी वस्तीजवळ आलेल्या वाघांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग गेल्या अनेक दशकांपासून वेगवेगळे प्रयत्न करीत आहे, मात्र त्याला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळताना दिसत नाही. वाघांची संख्या ही भविष्यात देखील वाढतंच जाणार आहे, त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना वाघांचे स्थलांतरण केल्यास ही समस्या कमी होईल, अशी प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपणे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिलीय.

Chandrapur live news
Chandrapur map
Chandrapur in which district
Chandrapur distance
Chandrapur tourist places
Chandrapur is famous for
Chandrapur in which state
Chandrapur area