सावधान! हॅकर्सना तुम्हीच पुरवताय तुमचा खासगी डेटा

0

तुम्ही जर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल, तर तुमच्या मित्र यादीतील कित्येकांनी आपले ‘एआय’ने तयार केलेले फोटो पोस्ट केल्याचे तुम्ही पाहिले असेल. सध्या विविध लिंकवर जाऊन कित्येक जण आपण स्वतः सैनिक असल्यावर कसे दिसणार, बॉडी बिल्डर तसेच विविध आकर्षक असे एआय फोटो तयार करत आहे. असे फोटो अगदी बिनधास्तपणे शेअर केले जात आहेत. त्यावर लाईक, कमेंटचा भरपूर मारा दिसतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपला डेटा चोरून विकतात, हे तुम्ही ऐकले असेलच. त्यामुळे आपण किती जबाबदारीने सोशल मीडिया वापरतो, हे पाहणेही गरजेचे आहे.

 

सध्या सोशल मीडियावर ‘एआय’फोट, अवताराचा खूप जास्त ट्रेंड आलेला आहे. तुमच्या मित्र यादीतील एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचा एआय एडिटेड फोटो शेअर करतो. तेव्हा त्यासोबत फोटोच्या खाली ज्या अॅपचा वापर करून हे करण्यात आलं, त्याची लिंकही शेअर होते. अधिकाधिक लोकांनी आपलं अॅप वापरावे, यासाठी त्या कंपनीने केलेली ही ट्रिक असते. समोरच्या व्यक्तीचा एआय फोटो पाहून आपणही ते ट्राय करावे, असे आपल्याला वाटते आणि आपण या लिंकवर क्लिक करतो. यानंतर ती लिंक ओपन होऊन ‘प्ले ऑन’ हे बटण समोर दिसते. मात्र, त्यावरती अगदी छोट्या अक्षरांमध्ये असे लिहिलेले दिसेल की, क्लिक केल्यानंतर संबंधित कंपनीकडे तुमचा फोटो आणि नाव जाईल. म्हणजेच हा डेटा त्यांच्याकडे सेव्ह राहील. केवळ एकच अॅप नाही तर आणखीही असे बरेच पझल्स आणि गेम्स असतात, ज्यात आपला डेटा आपण स्वखुशीने त्यांच्या हवाली करतो. त्यामुळे यापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले.

 

सोशल मीडिया हाताळताना काळजी घ्यावी

■ काही जणांना वाटू शकते की माझी प्रोफाइल तर अशीही पब्लिक आहे तर मग मला वेगळा काय धोका असेल, मात्र, येथेच खरी गोम आहे. कित्येक वेळा फोटोसाठी विचारण्यात आलेले प्रश्न, मागवण्यात आलेली माहिती हे अगदी साधे वाटणारे असले, तरी ही माहिती महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही एखादे ई- मेल अकाउंट सुरु करता किंवा एखाद्या वेब- साईटवर साईन अप करता तेव्हा पासवर्ड विसरल्यास सेक्युरिटी म्हणून काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यात तुमच्या गावाचे नाव, आवडते पुस्तक अशा गोष्टींचा समावेश असतो. सोशल मीडियाचे हे क्विझदेखील अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात. केवळ एवढाच धोका नाही. कित्येक गेम्सना तुम्ही आपल्या मित्र यादीत अॅक्सेस देता. यामुळे तुमच्या नावाने किवा तुमच्या फोटोचा वापर करून तुमच्या मित्र यादीतील लोकांना मेसेज केले जाऊ शकते. यात काही जणांचे डीपफेक फोटो तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

तुम्हीच देता तुमचे अॅक्सेस

■ तुम्ही कशा व्यक्त्ती आहात, तुमच्यावर किती जण प्रेम करतात, तुम्हाला कसा जोडीदार मिळेल, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या गेम्सही तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील. या सर्व गेम्समध्ये सहभागी होताना तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात. तुमचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव, तुम्हाला काय आवडते, कोणती गाणी आवडतात, अशी अनेक प्रकारची माहिती विचारली जाते. एवढेच नाही तर तुमचे फोटो, प्रोफाईल- वरील माहिती, ई-मेल आणि मित्र यादी यांचा अॅक्सेसही हे अॅप्स मागत असतात. केवळ मजा म्हणून कित्येक लोक ही माहिती भरून अशा अॅप्सना हवी ती परवानगी देऊन टाकतात. एआय फोटोसाठी दिलेली लिंक हे इथे केवळ एक उदाहरण आहे, असे कित्येक अॅप्स सध्या सोशल मीडियावर आहेत.