भंडारा : मोहाडी पंचायत समितीत ५ लाखांचा घोटाळा
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीत ५ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी कारवाईची मागणी करत पंचायत समिती सभापती रितेश वासनिक यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलीय.
पंचायत समिती, मोहाडी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सन २०२२-२३ मध्ये लेखाशीर्ष २२०५ अंतर्गत शासनातर्फे पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा लोकवर्गणीतून अगोदरच साजरा करण्यात आला होता. त्यामुळे प्राप्त निधी शासनाच्या खात्यात परत पाठवायला हवा होता. परंतु निधी परत न पाठवता खोटे बिल तयार करून सादर केले याची माहिती पंचायत समिती सभापती यांना कळताच त्यांनी यासंदर्भात विचारणा केली मात्र अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी करीता तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारदार यानी केली आहे. तर या संदर्भात अधिकारी बोलायला तयार नाही असे वासनिक यांनी सांगितले.
प्रियांका गांधींचा नंदुरबारमध्ये पंतप्रधानांवर हल्लाबोल
मोदींनी इंदिरा गांधींचा आदर्श घ्यावा
नंदुरबार मध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले? हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांना हिंमत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून काहीतरी शिकावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँगेसचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय
महायुती जिंकणार : मुख्यमंत्री शिंदे
लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी वैजापूरमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांचे मुंबई, ठाण्यानंतर छत्रपती संभाजी नगरीवर प्रेम होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबई, ठाण्यानंतर संभाजीनगरमध्ये तिसरी डरकाळी फोडली होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
भेंडवळची भविष्यवाणी
पीक, पाऊस उत्तम, पिकांवर रोगराई
सालाबादप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी केल्यानंतर आज, शनिवारी सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये सुरुवातीला पाऊस कमी असेल आणि उत्तरोत्तर वाढत जाईल. मूग आणि उडीद सर्वसाधारण, तीळ चांगला असेल. दरम्यान यावर्षी आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत वर्तवले गेले नाही. पीकं जोमात असूनही त्यांना अतिवृष्टीचा फटका बसेल, असं भाकीत करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. मांडणीचं भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते.
केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात केली पूजा
पंजाबचे CM भगवंत मान देखील उपस्थित
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरात पूजा केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही त्यांच्यासोबत होते. केजरीवाल यांच्यासह गोपाल राय, संजय सिंह आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेते मंदिरात पोहोचले. मुख्यमंत्री केजरीवाल दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी ४ वाजता मेहरौली आणि सायंकाळी ६ वाजता कृष्णा नगरमध्ये रोड शो होणार आहेत. केजरीवाल शुक्रवारी (10 मे) तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आले. ते 39 दिवस तिहार तुरुंगात होते. न्यायालयाने त्यांना 1 जून म्हणजेच 22 दिवसांचा दिलासा दिला आहे. त्यांना 2 जूनला तिहारमध्ये आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
दिल्लीत धुळीच्या वादळाने दोघांचा मृत्यू
23 जखमी, 9 उड्डाणे वळवली
दिल्ली एनसीआरमध्ये तीव्र उष्णतेच्या दरम्यान शुक्रवारी रात्री धुळीच्या वादळासह हलका पाऊस झाला. या काळात झाडे पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. वादळामुळे अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या विविध अपघातात एकूण 23 जण जखमी झाले आहेत. खराब हवामानामुळे 9 उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत. रस्त्यावर झाडे पडल्याने दिल्ली आणि परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
वर्ध्याचे अवचितराव देणार मोदींना आव्हान
वाराणसी लोकसभेसाठी जनसेवा गोंडवाना पार्टीतर्फे अर्ज
पंतप्रधान मोदी यांचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणून वाराणसी या शहराची नवी ओळख आहे. दोन वेळा ते येथून विजयी झाले असून आता यावेळी ते सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. त्यांच्या विरोधात वर्धा येथील बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी अवचितराव सयाम यांनी शुक्रवारी वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांनी स्वतःच स्थापन केलेल्या जनसेवा गोंडवाना पार्टीतर्फे ते लढणार आहे. येथे अर्ज सादर करणे खूप अवघड असे काम असल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी वाराणसी येथून बोलताना सांगितले. सुरक्षेचे कारण देत पदोपदी अडथळे निर्माण केल्या जात असल्याचा आरोप केला.
अथर्वशीर्ष अक्षय आनंदाचा राजमार्ग
डॉ.स्वानंद गजानन पुंड यांचे प्रतिपादन
श्री गणेश अथर्वशीर्ष च्या माधमातून भगवान श्री गणेशांच्या चरणी पोहोचत यांचे स्वरूप् असणा-या अखंड आनंदाची प्राप्ती आपल्याला देखील होऊ शकते. जीवनात कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनस्थितीला शांत ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. अथर्वशीर्ष, सुखी, समाधानी, प्रसन्न, आनंदी आयुष्याचा राजमार्ग म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. या दिव्य स्तोत्राचा अर्थ समजून घेऊन त्यानूसार आपली जीवनयात्रा सुनिश्चित केली तर जीवनातील प्रत्येकच दिवस अक्षयतृतीया राहील आणि मोरयाच्या प्रिय चतुर्थ अवस्थेमध्ये आपली चतुर्थी साजरी होईल.” असे विचार सुप्रसिध्द गाणपत्य तत्वज्ञान अभ्यासक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले. नागपूर नगरीचे ग्रामदैवत श्री टेकडी गणपती देवस्थानच्या वतीने दिनांक 3 मे ते 9 मे 2024 या कालावधीत आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष निरूपण मालिकेच्या समारोप प्रसंगी ते व्यक्त होत होते.
काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या
काँग्रेस नेते अराहुल गांधी यांची कबुली
काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकारणात, धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या ‘राष्ट्रीय संविधान परिषदेत’ राहुल गांधी म्हणाले की, “सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे.” भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
विजय वडेट्टीवारांविरोधात अदखलपात्र गुन्हा
शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भातील वक्तव्य
काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलेलेच असताना पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. भाजपतर्फे पोलीस ठाणे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान
पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणाऱ्या पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात आहे. पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार १८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे… पुणे लोकसभा मतदार संघात २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत… वडगाव शेरी मतदार संघात सर्वाधिक ४ लाख ६७ हजार ६६९ मतदार आहेत.
शिरपूर येथे जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
शिरपूर येथील भाटपूर गावात 8 मे रोजी रात्री पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती … दगडफेकी चार कर्मचारी जखमी झाले होते.. शिरपूर तालुक्यातील भाटपूर येथे तरुणाचा खून झाला होता …पंढरीनाथ भगवान चौधरी असे 24 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे..आरोपींना ताब्यात द्या, अशी जमावाकडून मागणी करण्यात आली.. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच दिवस यलो अलर्ट
विदर्भासह नागपूरमध्ये उकाडा
मध्यप्रदेशात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि दक्षिण भारतातील सिस्टम मुळे विदर्भातील आर्द्रता वाढली आहे. पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर दिवसाच्या उकाड्यात वाढ झाली असून, किमान तापमान 3.9 डिग्री सेल्सियसने वाढले. वातावरण दमट झाल्याने गर्मीत वाढ झाली. तर आर्द्रता 70 टक्क्यांवर पोहोचली आहे.
पुण्यातील एनडीए परिसरात साापडला बॉम्ब
खोदकाम करत असताना सापडला बॉम्ब
पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे. बीडीडीएस पथकाने घटनास्थळी येऊन बॉम्ब जवळच्या जंगलात नेऊन स्फोटकाच्या सहाय्याने बॉम्ब निकामी केला आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करत असताना बॉम्बसापडला . जवळच NDA आहे. त्यामुळे सराव करत असताना खूप वर्षापूर्वी तो पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.