Home LOCAL NEWS अंबाझरी भार प्रेषण केंद्रातर्फे ‘ब्लॅक स्टार्ट’ सराव यशस्वी

अंबाझरी भार प्रेषण केंद्रातर्फे ‘ब्लॅक स्टार्ट’ सराव यशस्वी

0

संकटकाळात वीज यंत्रणा सावरण्यासाठी सज्जता

नागपूर (Nagpur) दि. 21 जानेवारी 2026:- मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे ग्रीड निकामी होऊन अंधार पसरल्यास, शून्यातून वीज यंत्रणा कशी उभी करायची, याचे यशस्वी प्रात्यक्षिक महापारेषणच्या अंबाझरी भार प्रेषण केंद्रातर्फे बुधवारी करण्यात आले. या ‘ब्लॅक स्टार्ट’ सरावादरम्यान नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत सुरु होता., ग्राहकांचा वीज पुरवठ्याला कुठलीही बाधा न पोहोचवता हा तांत्रिक सराव यशस्वीरित्या पार पडला.

काय आहे ‘ब्लॅक स्टार्ट’ सराव?
जेव्हा संपूर्ण विद्युत ग्रीड निकामी होते, तेव्हा वीज निर्मिती केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी बाहेरून विजेची गरज असते. मात्र, कोणत्याही बाह्य मदतीशिवाय जलविद्युत प्रकल्पाच्या सहाय्याने वीज प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला ‘ब्लॅक स्टार्ट’ म्हणतात. भारतीय विद्युत ग्रीड कोड 2023 आणि महाराष्ट्र विद्युत ग्रीड कोड 2020 नुसार हा सराव करणे अनिवार्य आहे.

सकाळच्या सत्रात तांत्रिक चाचणी
बुधवारी सकाळी 10:03 ते दुपारी 12:02 या वेळेत हा सराव पार पडला. यामध्ये 132 केव्ही पेंच जलविद्युत प्रकल्पाचा मुख्य आधार घेण्यात आला. पेंच प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू करून ती 220 केव्ही कन्हान, 400 केव्ही खापरखेडा(नवीन), 220 केव्हि खापरखेडा(जुने), 400 केव्ही कोराडी, 220 केव्ही बुटीबोरी आणि 220 केव्ही व्हीआयपीएल (VIPL) या उपकेंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली.

या सरावासाठी या उपकेंद्रांतील काही तांत्रिक घटकांना मुख्य प्रणालीतून वेगळे करून त्यांच्यावर मर्यादित ‘लोड’ टाकला गेला. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे भविष्यात ग्रीड फेल्युअरसारखे मोठे संकट ओढवल्यास यंत्रणा जलद गतीने पूर्ववत करण्याचा विश्वास प्रशासनाला मिळाला आहे.

नागपूर-भंडारा जिल्ह्यांत भारव्यवस्थापन
या तांत्रिक प्रक्रियेत देखील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील वीजपुरवठा अखंडित सुरू होता. महावितरणने आधीच याबद्दल सूचना दिली असल्याने नागरिकांनी देखील सहकार्य केले. महापारेषणच्या अंबाझरी भार प्रेषण केंद्रातील अभियंत्यांनी अत्यंत अचूकतेने हे नियोजन केल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला नाही.

भविष्यातील मोठे तांत्रिक संकट टाळण्यासाठी आणि आपली यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी हा सराव अत्यंत महत्त्वाचा होता. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आम्ही वीजपुरवठा पुन्हा जलद सुरू करू शकू. असा विश्वास अंबाझरी भार प्रेषण केंद्रातील अधिका-यांनी यावेळी व्यक्त केला.

आजच्या या ‘ब्लॅक स्टार्ट’ सरावाच्या यशस्वी आयोजनासाठी महावितरणच्या नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश अणे आणि तीनही वीज कंपन्यांतील अधिका-यांनी अंबाझरी भार प्रेषण केंद्रातील अधीक्षक अभियंता श्रीमती वैशाली पाझारे व सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.

१. महापारेषणच्या अंबाझरी भार प्रेषण केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या ‘ब्लॅक स्टार्ट’ सरावात सहभागी अभियंत्यांसोबत महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके.
२. महापारेषणच्या अंबाझरी भार प्रेषण केंद्राच्या अधीक्षक अभियंता श्रीमती वैशाली पाझारे यांचे अभिनंदन करताना महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे.