
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात अखेर पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.
मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार 29 महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे
- अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका
- अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)
- इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका
- सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी एकूण 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होतील. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार या जागांची विभागणी करण्यात आली असून. या सोडतीनुसार अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या चार शहरांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील. तर लातूर आणि नवनियुक्त जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे अनेक प्रस्थापित पुरुष नेत्यांना माघार घ्यावी लागणार असून, राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांच्या शोधासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.














