मेडिकलमध्ये चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची वाणवा

0

रुग्ण, नातेवाईकांची प्रचंड गैरसौय

नागपूर (nagpur) :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Medical) चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे होणारी ओढाताण रुग्णांच्या बोकांडी बसत आहे. अत्यवस्थ रुग्णांना इतरत्र हरविण्यासाठीही मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांनाच व्हिलचेअरपासून ते ऑक्सिजनचे सिलेंडर ओढत (Relatives have to drag the oxygen cylinder and wheelchair) नेण्याची वेळ येत आहे. चिमुकल्या मुलांचे यात सर्वाधिक हाल होत आहेत. चतूर्थश्रेणी कर्मचारीच वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अशीच वेळ दिड महिन्यांच्या बाळतीणीवर बुधवारी ओढवली. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्लीतून आलेले नागा तुमराम या आदिवासी यांच्यावर ही वेळ ओढवली. काही केल्या ताप कमी होत नसल्याने त्यांनी दिड महिन्यांच्या मुलाला घेऊन गुरुवारी नागपूर गाठले. बाल रोग विभागात वॉर्ड क्रमांक 6 मध्ये त्यांनी मुलाला भरती केले. मात्र छातीत कफ जमा झाल्याने त्यांचा मुलगा धड श्वासही घेऊ शकत नव्हता. त्यानंतर तुमराम यांना मुलाला घेऊन लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात जाण्यास सांगण्यात आले. मुलाच्या तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लावल्याने त्यांनी तिथे उपस्थित परिचारिकांना कोणाला तरी सोबत पाठविण्याची विनंती केली. मात्र आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचार करायचे असतील तर घेऊन जा मुलाला तिकडे असे दरडावले. अखेर नाईलाज झाल्याने तुमराम यांनी मुलाला हातात उचलून धरत पत्नीच्या हातात ऑक्सिजनचे सिलेंडर दिले. त्याच अवस्थेत या पती पत्नीने अतिदक्षता वॉर्ड गाठला. अत्यवस्थ रुग्णांना देखील चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरविले जात नसल्याने रुग्णांचे आतोनात हाल सुरू आहेत. मेडिकलमध्ये हा प्रकार नित्याचा झाला आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था रुग्णांच्या मात्र बोकांडी बसत आहे.

125 अटेंडंटवरच संपूर्ण भार

मेडिकलमध्ये चतूर्थश्रेणीची 820 पदे मंजूर आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. एकण मंजूर पदांमध्ये 253 पदे सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. शिवाय अनेक जण निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मेडिकलमध्ये स्वच्छतेसाठी बाह्यस्त्रोतामार्फत 165 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एक शिफ्ट मध्ये 50 आउट सोर्सिंग अटेंडेंट सेवा देतात. सध्याच्या स्थितीत 1800 खाटांची क्षमता असलेल्या मेडिकलचा डोलारा केवल 100-125 अटेंडेंटवर पेलला जात आहे.

आकडे बोलतात
चतूर्थश्रेणीची 820 पदे मंजूर
त्यातील 410 पदे रिक्त
बाह्यस्त्रोतामार्फत 165 अटेंडेंट