मुंबई : अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत करण्याची गरज नाही, हे पवारांचे मत त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण, कोळसा घोटाळ्याच्या आरोपांवर न्यायालयाच्या समितीनंतरही जेपीसीमार्फत चौकशी करण्यात आली होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणात काँग्रेसविरोधी भूमिका मांडली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. (Congress`s Stand on Sharad Pawar Pawar`s Statement on JPC) शरद पवारांचे हे वैयक्तिक मत असले तरी पंतप्रधान मोदी हे अदानीच्या प्रकरणात घाबरत का आहेत? असा सवाल आता देशाची जनता विचारत आहे. कारण यामध्ये एलआयसीचा, एसबीआयचा किंवा पीएफचा पैसा असण्याची शक्यता असल्याने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कारण त्यांचा पैसा लुटला जात आहे. देशाची जनता पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहे पण पंतप्रधान या विषयावर बोलायला तयार नाहीत, असा आरोप पटोले यांनी केला.
शरद पवार यांनी अदानी प्रकरणात भाष्य करून वेगळी भूमिका घेतली आहे. अदानी प्रकरणात विरोधकांची संख्या नसल्याने जेपीसी चौकशीला अर्थ नाही, असा दावा पवारांनी केला आहे. एखाद्या विदेशी कंपनीच्या अहवालावरून भारतीय कंपनीला लक्ष्य करणे देखील योग्य नाही, असे सांगताना देशाच्या विकासात उद्योगपतींचे देखील योगदान असते, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे