आचारसंहितेत अडकली रासायनिक खतविक्री

0

=

अमरावती (Amravti), 23 मार्च  : खताच्या चुंगड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने आदर्श आचारसंहितेमुळे खतविक्रीच अडचणीत आली आहे. मात्र यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न कृषी केंद्र संचालकांना पडला आहे. स्टीकर लावून फोटो झाकायचा असेल तर संबंधित कंपन्यांनीच स्टीकर पुरवावीत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. खतविक्री थांबविण्यात आली आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.

केंद्र शासनाच्या खते विभागाने देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या. त्यानुसार गतवर्षीपासून कंपन्यांकडून भारत नावाखाली खतपुरवठा होत आहे. खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा फोटो आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर आयोगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र काढून, कोणत्याही राजकीय व्यक्तीचे फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून झाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचे आदेश दिले आहे.त्यात खत गोण्यांचाही समावेश होत आहे. स्टीकर लावल्याचे आढळलेनाही अथवा कोणाची तक्रार आली तर संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.त्यातच खत विक्रेत्यांकडे हजारो टन खताचा साठा गोदामात आहे. आता सध्या उन्हाळी पिकासह -भाजीपाला व ऊस पिकासाठी शेतकरी खताची मागणी करीत आहेत. खताच्या चुंगड्यावर असलेला फोटो झाकण्यासाठी दुकानदाराकडे स्टिकर उपलब्ध नाहीत. बाजारातून अशीस्टिकर विकत आणणे दुकानदारांना परवडत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. तर गोदामात खताचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी कृषी केंद्र संचालक तेशेतकऱ्यांना विक्री करू शकत नाहीत. तेव्हा संबंधित कंपन्यांनी फोटोवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कृषी केंद्र संचालक करीत आहेत.