तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांवर सीबीआयची धाड

0

नवी दिल्ली (New Dellhi), 23 मार्च  : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरावर आज, पहाटे सीबीआयने धाड टाकली. सीबीआयने गुरुवारी चौकशीसाठी रोख रकमेशी संबंधित गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर धाडी टाकल्यात.

यासंदर्भातील माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकातासह महुआ यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. सीबीआयचे पथक कोलकात्यातील अलीपूर भागात महुआ यांचे वडील दीपेंद्रलाल मोईत्रा यांच्या फ्लॅटवरही पोहोचले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने शनिवारी महुआ मोईत्रा यांच्या रोख रकमेच्या प्रकरणात कोलकातासह अनेक ठिकाणी झडती घेतली. केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक शनिवारी पहाटे कोलकाता आणि इतर शहरांमधील मोईत्रा यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यांनी शोध कारवाईची माहिती दिली आणि ऑपरेशन सुरू केले.लोकपालच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) गुरुवारी टीएमसीच्या माजी खासदार मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. लोकपालने सीबीआयला 6 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey)यांनी मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक तपासाचे निष्कर्ष मिळाल्यानंतर लोकपालने सीबीआयला या सूचना दिल्या आहेत. उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांवर टीका करण्यासाठी मोईत्रा यांनी दुबईस्थित उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप लोकसभा खासदार दुबे यांनी केला होता.