Home Breaking news चंद्रपूर मनपा सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग; वडेट्टीवार–उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक

चंद्रपूर मनपा सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग; वडेट्टीवार–उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक

0

सत्तास्थापनेच्या रणनीतीवर सुमारे ३० मिनिटे बंदद्वार चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली अधिकच तीव्र झाल्या असून, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भेट पार पडली आहे. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या बैठकीत चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याची राजकीय स्थिती, सत्तास्थापनेसाठीची संभाव्य रणनीती, तसेच पुढील राजकीय गणितांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मनपेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, कोणते पक्ष एकत्र येऊ शकतात आणि सत्तासमीकरण कसे आकार घेईल, यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचे समजते.

विशेष म्हणजे, चंद्रपूर मनपेत सध्या सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून, प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशा वेळी वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काही तासांत किंवा दिवसांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.