औरंगाबाद: भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटातच आता धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. विधिमंडळ अधिवेशनात सत्तार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले व त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. आता याबाबत बोलताना माझ्याच पक्षातील नेतेच माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar sensational allegation)) यांनी आज केला. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांच्याकडून हे प्रकार सुरु असल्याचा दावाही सत्तार यांच्याकडून करण्यात आलाय. त्यामुळे शिंदे गटातील हा वाद कोठवर जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधिमंडळ अधिवेशनात अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळा, गायरान जमिन घोटाळ्यांचे आरोप झाले होते. त्यावर अब्दुल सत्तार यांनी प्रथमच मौन सोडले असून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहेत. राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप आपल्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोक यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे सर्वांच्या घोटाळ्यांचा डेटा आला असून याच्या चौकशा झाल्या तर यांची पळताभुई थोडी होईल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा