रोजच्या जेवणावळी आणि तळीरामांचीही चोख व्यवस्था, ग्राम पंचायत निवडणुकांना भरला रंग

0

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्राम पंचायतींसाठी १८ डिसेंबरला निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूूमीवर गावांच्या राजकारणावर निवडणुकीची छाया पसरली आहे. मतदारांना खुष करण्यासाठी उमेदवारांकडून रोजच्या रोज जेवणावळी सुरु आहेत. तसेच तळीरामांचीही रोजच्या रोज चोख व्यवस्था होत असल्याचे चित्र बहुतांशी गावांमध्ये दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याने उमेदवारांकडून मतदारांच्या घरांचे उंबरठे झिजवले जात आहेत. अनेक गावांमध्ये दैनंदिन गप्पांमध्ये केवळ निवडणुकीची आणि उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या आमिषांचीच चर्चा सुरु आहे. (Amravati Gram Panchayat Election). जिल्ह्यात २५७ ग्राम पंचायतींमध्ये सरपंचपदासाठी १२७९ तर सदस्य होण्यासाठी ४७९६ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती आहे.
मागील पंधरा दिवसांपासून निवडणुकीचा जोमाने प्रचार सुरु आहे. गावच्या राजकारणात सध्या जेवणावळींना अधिक महत्व दिले जात आहे. त्यामुळे कोणाच्या पंक्तीत किती लोक जेवले, याची माहिती प्रतिस्पर्ध्यांकडून घेतली जात आहे. उमेदवारांनी गावातील तळीरामांसाठीही चोख व्यवस्था ठेवली आहे. ६ सरपंच व ४१३ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने या गावांमध्ये मात्र हे चित्र आढळून येत नाही. यंदा सरपंचपदाची निवड जनतेतून थेट होत असल्याने जेवणावळी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे जाणकार सांगतात. उमेदवारांच्या आश्वासनांपेक्षा गावागावांमध्ये जेवणावळींचीच चर्चा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यावेळी बंडखोरीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यापायी देखील गावांमधील राजकीय वातावरण तापले आहे.