१४ फेब्रुवारी काळा दिवस म्हणून जाहीर करा, जवानांची मागणी

0

 

(Dhule)धुळे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज ४ वर्ष पूर्ण झालीत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांना आज धुळ्यातील शहीद अब्दुल हमीद स्मारकाजवळ माजी सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज १४ फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करावा आणि काळा दिवस म्हणून पाळण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहताना जवानांनी यावेळी राजकीय नेत्यांवर सडकून टीका देखील केली. माजी सैनिक शबाब खाटीक यांनी बोलताना सांगितले की, ज्या वेळेस जवान शहीद होतात तेव्हाच राजकारण्यांना त्यांची आठवण होते आणि फोटो काढून शहीद जवानांना विसरून जातात. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी पुलवामा घटनेत शहीद जवानांचा लाभ घेतला, त्यानंतर त्यांना विसरून गेले असा गंभीर आरोप माजी सैनिकांनी यावेळी केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळेस सीआरपीएफ जवान सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या जवानांना ज्या सुविधा मिळतात त्या मिळत नाहीत, तसेच आमच्या अनेक मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही यापुढे सक्तीने पावले उचलावी लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.