देवरंजनचा बारावा वर्धापन दिन थाटात साजरा

0

शिबिर घेणाऱ्या संस्थांच्या पाठीशी नाट्यपरिषद 

 

नागपूर(Nagpur), २४ जून :- मोबाईल आणि दूरदर्शनच्या विळख्यात अडकलेल्या भावी पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी शिबिरांची आज अतिशय गरज आहे. अशा शिबिरांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन अ.भा. मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती) चे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी काल येथे दिले.

देवरंजन बहुउद्देशीय संस्थेचा बारावा वर्धापन दिन आणि नृत्य नाट्य शिबिराच्या समारोपानिमित्त विशेष रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि पुरस्कार वितरण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ नरेश गडेकर बोलत होते.

बजाज नगरातील लोकमान्य टिळक सभागृह, कस्तुरबा भवन येथे आयोजित या कार्यक्रमास दामिनी क्रिएशनचे संचालक संदीप दर्यापूरकर, रुक्माई सेवा मंडळाचे सचिव विलास कुबडे प्रमुख अतिथी म्हणून तर विश्व केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण पांढरे, नाट्य अभिनेत्री आसावरी तिडके, भारती दर्यापूरकर, अविनाश सोनुले, डॉ. राजेश नाईक आणि नितीन पात्रीकर यांचीही उपस्थिती होती. देवरंजन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक प्रवीण देशकर, समाप्ती देशकर आणि चिन्मय देशकर यांनी अतिथींचे स्वागत केले.

वाघेश्वरी चौधरी हिने गणेश वंदना सादर केली. शिबिरातील शिबिरार्थींनी विविध नृत्य सादर केले. त्यानंतर चिन्मय देशकर लिखित आणि दिग्दर्शित “रयतेचा राजा” हे सर्वांग सुंदर नृत्य नाट्य सादर करण्यात आले. याप्रसंगी ज्योती सारवे आणि इतर शिबिरार्थींनी शिबिरातील आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा सोनुले यांनी तर आभार प्रदर्शन अंश केदारने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवींद्र भुसारी, आकाश काळे, संजोग येरणे आणि मुग्धा देशकर काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.