कोरोनासंदर्भात लवकरच नवा टास्क फोर्स स्थापन करणार: देवेंद्र फडणवीस

0

नागपूरः कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एखादी समिती किंवा टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा टास्कफोर्स आपल्याला जगभरातील बाबींचे अपडेट देत राहिल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकार आता कोरोना नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्र सरकारने यासंदर्भात सर्व राज्यांना सूचना केली असून त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirsu Outbreak) पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. रुग्णांचे सर्व नमुने जिनोम सीक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सध्या, राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.


जगभराचं टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकारने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील आणि जगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या आठवड्यात जगात 36 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचे संकट फार गंभीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दररोज अनेक जणांचा मृत्यू होत असून मृतदेहांचा खच पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून औषधे आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली केली.