नागपूर : एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो आता भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रत्येकच पक्षाला या प्रक्रियेतून जावे लागते. पक्ष उभारणीसाठी प्रत्येकाला जीवाचे रान करावे लागते. यश आणि अपयश हे मनसेच्या वाट्याला आले आहे. पण त्यामुळे खचून जायचे कारण नाही. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे रहायचे, यश नक्की मिळेल, असा आत्मविश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जागविला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या एक दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय मेळाव्यात राज ठाकरे यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटली. यानंतर मेळाव्यास छोटेखानी मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले, काळानुरूप मतदार त्याच त्या लोकांना कंटाळतात. आज आपल्या पदाधिकाऱ्यांना लोक म्हणतील की हे पोट्टं काय करणार? पण हेच पोट्टं तुमच्यावर नंतर वरवंटा फिरवेल, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी सभागृहात प्रचंड हंशा पिकला. राज म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये आग असली पाहिजे. ती असेल तर यश निश्चितपणे मिळेल. पराभव होतच राहतो. जगात दिग्गजांचे पराभव झाले. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. 1952 साली त्यांनी जनसंघ स्थापन केला. अतिशय किरकोळ प्रमाणात त्यांचे लोक निवडून येत होते. आणिबाणीच्या काळानंतर 1980ला जनसंघाचे भाजप झाले. 1996ला अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मग 1998 ला पुन्हा वाजेपेयी पंतप्रधान झाले. मग 1999ला पुन्हा पंतप्रधान झाले. या तिन्हीवेळा त्यांना पूर्ण बहुमत नव्हते, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
भाजपला खऱ्या अर्थाने 2014ला बहुमत मिळाले. 1952 ते 2014… कितीही मतभेद असले… काही असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना 2014मध्ये यश आले. इतकी वर्ष गेली. किती पिढ्या गेल्या. किती लोकांनी काम केले असेल, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. काँग्रेसचा संघर्षही काही कमी नाही. 1966 साली स्थापन केलेली शिवसेना. शिवसेनेचा कधी पोटनिवडणुकीत एखादा आमदार निवडून यायचा. कधी नगरसेवक यायचा. 1984-85 साली एकटे छगन भुजबळ निवडून आले. 1990ला खऱ्या अर्थाने शिवसेनेचे खासदार निवडून आले. 1995ला शिवसेनेची सत्ता आली. 1966 ते 1995 हा संपूर्ण संघर्ष आणि मेहनतीचा काळ होता. त्यानंतर त्यांना यश मिळाले, असेही त्यांनी सांगितले. आजचा काळ पाहिला तर यांना हवेय काय? असा प्रश्न पडतो. सर्व गोष्टी लवकर हव्यात. वडा टाकला की लगेच तळून यायला पाहिजे. मनसेच्याही वाट्याला यश आले- अपयश आले. पण आपण खचलो नाही. मी खचणार नाही. ज्या घरात होतो तिथे अनेक पराभव पाहिले. पराभूत झाल्याने रडणारी माणसे मी पाहिलेली आहेत. तेव्हा मी कसा खचणार? असेही राज म्हणाले.