सावरकरांच्या त्यागाची अवहेलना करु नका, ठाकरे गटाने राहुल गांधींना सुनावले

0

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वा. सावरकरांबद्धल वादग्रस्त वक्तव्ये करीत असताना उद्धव ठाकरे गटाची कुचंबणा होत आहे. त्याचे पडसाद ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेखाच्या माध्यमातून उमटत आहेत. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल, अशी भावना ठाकरे गटाने सामनातील अग्रलेखातून व्यक्त केली (Uddhav Thackeray on Savarkar Issue) आहे. सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण एकत्र आलो आहोत. त्याला फाटे फुटू देऊ नका. आता वेळ चुकली तर देश हुकूमशाहीकडे जाईल, असे मत उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथी जाहीरसभेतही व्यक्त केले होते.

ठाकरे गटाने या मुद्यावर मुखपत्रात भूमिका मांडताना नमूद केले आहे की, हुकूमशहा हा सदैव डरपोकच असतो. हुकूमशहा आधी न्यायव्यवस्था ताब्यात घेतो, संसदेवर ताबा मिळवतो व विरोधकांना नष्ट करतो. यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध लढण्यासाठी वीर सावरकरांनी वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अष्टभुजा देवीसमोर ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी क्रांतिकारक शपथ घेतली होती. राहुल गांधी यांनी अशीच शपथ घेऊन सध्याच्या गुलामीविरुद्ध लढा उभारायला हवा. राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे. ‘‘माझे आडनाव सावरकर नाही’’, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे.

अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धय़ांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळय़ा चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. सावरकर हे जगातील असे एकमेव स्वातंत्र्य योद्धे होते, ज्यांना जन्मठेपेच्या दोन-दोन शिक्षा झाल्या, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा