
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला? या प्रश्नाचे उत्तर जनतेला माहिती नसेल. पण, ते आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Allegation against Uddhav Thackeray ) यांनी केलाय. त्यांच्यावर अटकेची तलवार होती. जर त्यांना अटक झाली तर त्यांच्या चौकशीतून संशयाची सुई कोणाकडे जाईल, याच भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, असेही आमदार कांदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांची नार्को चाचणी केल्यास कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असेही ते म्हणाले. सगळे सत्य बाहेर यावे म्हणूनच उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मालेगाव येथे पार पडलेल्या जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य केले. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना आमदारांनी आता उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार कांदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना माझे जाहीर आव्हान आहे, माझीही नार्को टेस्ट करा. पण, मी दहा कंत्राटदारांची नावे सांगतो. त्यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेतले याचीही चाचणी होऊ दे. मी फक्त चारच प्रश्न विचारतो. त्यांनी मला शंभर प्रश्न विचारावेत. माझ्या नार्को चाचणीत मी सरकार बदलीसाठी एक रुपया जरी घेतल्याचे आढळले तरी मी राजकारणातून संन्यास घेईल, असेही कांदे म्हणाले आहेत.