पुस्‍तकांमध्‍ये व्‍यक्‍तित्‍व विकासाचा समान धागा – डॉ. विनायक देशपांडे

0

Nagpur : व्‍यक्‍ती मानसिकदृष्‍ट्या स्‍वस्‍थ असला की तो भौतिक जगात राहूनही आध्‍यात्मिक होऊ शकतो आणि आध्‍यात्मिकता त्‍या व्‍यक्‍तीला अनेक बाबतीत नेतृत्‍व करण्‍यासाठी पुरक ठरत असते. डॉ. दिलीप सावरकर यांच्‍या स्‍वास्‍थ्‍य, आध्‍यात्मिकता आणि नेतृत्‍वगुणांवरील आधारित तिन्‍ही पुस्‍तकांमध्‍ये व्‍यक्तित्‍व विकासाचा समान धागा बघायला मिळतो, असे उद्गार जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी काढले.

धरमपेठ विज्ञान महाविद्यालय आणि एसएफएस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. दिलीप सावरकर यांच्या ‘एनरिच द रूट्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी’, ‘एनॉरिच द रूट्स ऑफ गुड हेल्थ’ आणि ‘एनरिच द रूट्स ऑफ लिडरशीप’ या तीन पुस्‍तकांचे प्रकाशन बुधवारी पार पडले. त्‍यावेळी ते बोलत हेाते. बी.एस.एस. एज्युकेशनल फाऊंडेशन आणि सुदर्शन ग्रुप ऑफ पब्लिकेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लब हॉल झालेल्‍या या कार्यक्रमाला मंचावर डॉ. विनायक देशपांडे यांच्‍यासह प्रमुख वक्ता म्‍हणून आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे, नाट्यलेखक डॉ. पराग घोंगे, कवयित्री सना पंडित यांची उपस्‍थ‍िती होती.

डॉ. दिलीप सावरकर यांच्‍या तीन पुस्‍तकांचे थाटात प्रकाशन

डॉ. मंजुश्री सरदेशपांडे ‘एनरिच द रूट्स ऑफ लिडरशीप’ या पुस्‍तकावर भाष्‍य करताना म्‍हणाल्‍या, यश प्राप्‍त करायचे असेल तर अडचणींवर मात कशी करायची, समोर आलेल्‍या आव्‍हानांचा सामना कसा करायचा, याचे मार्गदशन या पुस्‍तकात दिले असून चांगले नेतृत्‍व आपल्‍यातील क्षमता ओळखून इतरांना प्रेरित करण्‍याचे काम करते, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

‘एनरिच द रूट्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी’ या पुस्‍तकावर भाष्‍य करताना डॉ. पराग घोंगे म्हणाले, आध्‍यात्मिकता हा व्‍यक्‍तीच्‍या प्रगल्भ होण्‍याचा प्रवास असून स्‍वत:ला स्‍वत:शी असलेले नाते आणि अवकाशाशी असलेले नाते या प्रवासातून उलगडत जाते. प्रगल्‍भतेच्‍या प्रवासाला कसे जायचे, याचे मार्गदर्शन या पुस्‍तकात वाचालायला मिळते. सना पंड‍ित यांनी ‘एनॉरिच द रूट्स ऑफ गुड हेल्थ’ या पुस्‍तकावर भाष्‍य केले. त्‍या म्‍हणाल्‍या, तुम्‍हाला सुदृढ आयुष्‍य जगायचे असेल तर तुमचे अंतरंग आणि बहिर्रंग कसे सुदृढ ठेवावे, यावर डॉ. सावरकरांनी या पुस्‍तकात मार्गदर्शन केले आहे.
डॉ. दिलीप सावरकर तिन्‍ही पुस्‍तकांचा प्रवास उलगडला. एआयएम हेल्थ सेंटरमध्‍ये काम करत असताना रुग्णांची काळजी घेणे, त्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे असे दैवी कार्य करण्याची संधी मिळाल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मुळे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. अनघा नासेरी यांनी केले. कार्यक्रमाला सुनेत्रा सावरकर, चैतन्‍य सावरकर,अमृता सावरकर यांच्‍यासह कुटुंबिय व मित्र परिवार मोठ्या संख्‍येने उपस्थिती होते.