बुलढाणा, 01 जुलै : बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघात प्रकरणी बसचालक आणि क्लिनर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 8 जण जखमी आहेत.
बसचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती बसचालकाने दिलीय. परंतु, खरेच बसचा टायर फुटून अपघात झाला आणि बस नंतर पेटली की, ड्रायव्हरला डुलकी लागली होती ?, याविषयी संशय निर्माण झाला आहे. कारण बसचा टायर फुटून तो तुटल्याची कुठलीही निशाणी घटनास्थळावर अद्याप पोलिसांना आढळलेली नाही. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची (क्र. एमएच 29 बीई 1819) ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. नागपूरहून शुक्रवारी 30 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. तर 1 जुलैच्या रात्री 1 वाजून 22 मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला असे वाहन चालकाचे म्हणणे आहे.
या अपघातातून ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख आणि त्याचा सहकारी अरविंद जाधव हे दोघेही बचावले आहेत. या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. बस डिव्हायडरला धडकून उलटताच हे दोघे बसच्या काचा फोडून पळाले, असे बसमधून वाचलेल्या दोन प्रवाशांनीच सांगितले. पोलिसांनी ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख आणि क्लिनर जाधव यांना ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे.