पुंछमधील त्या गावात ईद साजरी होणार नाही

0

पुंछ : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले. ज्या ट्रकमधून जवान जात होते. त्यात इफ्तारचे सामान होते व ते संगिओ या गावात नेण्यात येत होते. तेथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दहशतवादी हल्लात पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर ( Poonch Terror Attack) गावकऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. दहशतवाद्यांचा या इफ्तार पार्टीला विरोध होता. भारतीय लष्करी जवान जम्मू – काश्मीर मधील विविध भागात अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. याच आयोजनावर नाराज होऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण संगिओ गावावर शोककळा पसरली आहे. जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत गावकऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. खरेतर भारतीय जवानांना येथील लोक आपलेसे तर करून घेणार नाहीत, अशी भीती दहशतवाद्यांना आहे. जर असे झाले तर त्यांना भारतीय जवानांविरोधात येथील लोकांना भडकवता येणार नाही. म्हणूनच भारतीय जवानांची येथील लोकांशी होणारी जवळीक दहशतवाद्यांना मान्य नाही. जवानांशी सलगी करणाऱ्या लोकांकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जाते. जवनांना आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची माहिती मिळताच हा हल्ल्याचा कट रचला. जेव्हा जवान इफ्तारचे सामान घेऊन ट्रक जात होता, तेव्हाच हा हल्ला करण्यात आला. पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला नंतर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या घटनेत राष्ट्रीय राइफल्स(आरआर)चे हवालदार मनदीप सिंह, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह हे जवान शहीद झाले. एक जवान गंभीर जखमी असून, त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. पीएफएफ ही पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात संगिओ पंचायतीचे सरपंच मुखतियाज खान यांनी सांगितले की, आमचे पाच जवान शहीद झाले. त्यामुळे आम्ही ईद साजरी तरी कशी करणार. आम्ही केवळ नमाझ अदा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.