मुंबई (Mumbai) : मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, या शब्दात (I would like to be Chief Minister) आपली राजकीय महत्वाकांक्षा जाहीर करणाऱ्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Ajit Pawar) म्हणाले की, “मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे? पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनायला 145 आकडा लागतो. हा आकडा अजित पवार यांच्याकडे असेल तर त्यांनी अगदी सहज मुख्यमंत्री बनावं. मी बनतो, मी बनतो असं म्हणण्याचं काहीच कारण नाही” असे पटोले म्हणाले. तर “अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. पण अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे” अशा शेलक्या भाषेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांचे कौतूक केले.
तो नाईलाज होता
अजित पवार (Ajit Pawar)यांच्या मुलाखतीतील वक्तव्यांची बरीच चर्चा होत आहे. अजित पवार यांनी मुलाखतीवेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ नव्हती घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. या व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवे होते” या शब्दात पटोलेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्रीपदाचे नंतर पाहू-संजय राऊत (Sanjay Raut)
तर संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा काही प्रथमच व्यक्त केलेली नाही. यापूर्वीही अनेकदा ते आपल्या या इच्छेबाबत बोलले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, काही जण लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री झाले आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून गद्दारांनी सत्ता मिळवली आहे, असे ते म्हणाले. 2024ला आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत पाहू, असेही खासदार राऊत म्हणाले.