
बोकारो : झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील लुगू टेकडीवर सोमवारी (दि.२१) रोजी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला प्रयाग मांझी उर्फ विवेकसह आठ माओवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे.सोमवारी दुपारी पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डीजीपी अनुराग गुप्ता यांनी सांगितले की, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य प्रयाग मांझी उर्फ विवेक आणि केंद्रीय समितीचे सदस्य सहदेव सोरेन यांच्यासह २०-२५ नक्षलवादी लुगू टेकडीवर उपस्थित असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ते काहीतरी मोठी घटना घडवण्याचा कट रचत आहेत. या माहितीच्या आधारे संयुक्त दलांची एक टीम तयार करण्यात आली. या पथकात २०९ कोब्रा बटालियन, बोकारो पोलिस, झारखंड जग्वार आणि सीआरपीएफचे सैनिक समाविष्ट होते. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन डाकाबेडा’ असे नाव देण्यात आले. ही मोहीम बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकडी भागात राबविण्यात आली. सोमवारी सकाळी ५:३० च्या सुमारास, सुरक्षा दल आणि माओवादी पथकामध्ये अनेक चकमकी झाल्या. मोहीम अजूनही सुरू आहे.
या कारवाईदरम्यान आतापर्यंत आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे; इतर पाच जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
तिघांची ओळख पटली
ज्यांची ओळख पटवण्यात आली आहे त्यात माओवादी केंद्रीय समिती सदस्य आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेले प्रयाग मांझी उर्फ विवेक, विशेष क्षेत्र समिती सदस्य अरविंद यादव आणि झोनल समिती सदस्य आणि १० लाख रुपयांचे बक्षीस मिळालेले साहब राम मांझी यांचा समावेश आहे. अरविंद यादव उर्फ अविनाश हा मूळचा बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सोनू पोलीस स्टेशन परिसरातील ढेलगा, मोहनपूर येथील रहिवासी होता आणि तो झारखंडमध्ये सक्रिय होता. त्याच्यावरील बक्षीस अद्याप जाहीर झालेले नव्हते. त्याच्या पदानुसार, त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात येणार होते. सध्या बिहारमध्ये अरविंद यादववर ३ लाख रुपयांचे बक्षीस आहे. उर्वरित पाच नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयाग मांझीचे पूर्ण नाव प्रयाग मांझी उर्फ विवेक उर्फ फुचना उर्फ नागो मांझी उर्फ करण उर्फ लतरा आहे. तो धनबादच्या टुंडी पोलीस स्टेशन परिसरातील दलुबुधा येथील रहिवासी होता. दहशतवादी निधी प्रकरणातही एनआयएला तो हवा होता. या कारवाईत सहभागी असलेल्या सैनिकांमध्ये १ कोटी रुपयांचे बक्षीस वाटले जाईल, असे डीजीपींनी सांगितले.
शस्त्रेही जप्त
सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. शोध मोहिमेत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून आतापर्यंत चार इन्सास रायफल, एक एसएलआर आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.