अमरावती : जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, तिसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर आहेत. या दरम्यान जिल्हा परिषद मुख्यालयाजवळ शेकडो कर्मचारी संपात सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. ये जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नो पार्किंग मध्ये असलेल्या दुचाकी उचलण्याची कारवाई केली. याला प्रत्युत्तर म्हणून उपस्थित कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या वाहनाला घेराव घातला. तसेच संतप्त संपकऱ्यांनी वाहतूक शाखेच्या वाहनातून आपल्या गाड्याही बाहेर काढल्या. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.