नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या 

0

आनंद दहागावकर/गडचिरोली

गडचिरोली: मागील काही महिन्यापासून शांत असलेले नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात एका माजी सभापतीची हत्या केली आहे. सुखराम महागु मडावी (४६) रा. कियर, असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते.

प्राप्त माहितीनुसार शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास काही नसल्यांनी कियर गाठून सुखराम मडावीला घरातून गावाबाहेर नेले. गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी नक्षल्यांनी त्यांचा तोंड बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे. सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षल्यांनी पत्रके देखील टाकले आहे. नेमकं त्या पत्रकात काय लिहिले आहे आणि हत्येचा कारण काय हे कळू शकले नाही.

भामरागड तालुका मुख्यालयापासून कियर हे गाव जेमतेम १२ किलोमीटर अंतरावर असून कोठी पोलीस मदत केंद्रात समाविष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. मृतदेह भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारच्या कठोर धोरणामुळे मागील काही महिन्यात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. बरेच नक्षल्यांनी आत्मसमर्पण देखील केली आहे. जिल्ह्यात नक्षलवाद संपुष्टात येईल आशा असतानाच पुन्हा एकदा नक्षल्यांनी डोके वर काढल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.