त्यागाची तयारी ठेवण्याचे फडणवीसांचे आमदारांना आवाहन

0

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या आमदारांनी त्याग करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत बोलताना केल्याची बातमी एका माध्यम समूहाने दिली आहे. (DCM Devendra Fadnavis in MLA Meeting) अजित पवार व त्यांच्या समर्थकांच्या सरकारमधील प्रवेशामुळे सत्ताधारी शिवसेना व भाजप आमदारांमध्ये नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आमदारांची बैठक घेतली.
आमदारांपुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील सद्यस्थितीत पाहता बेरजेचे राजकारण आवश्यक आहे. महाविकास आघाडी तुटणे आपल्यासाठी अत्यावश्यक होते. तीन पक्षांची एकत्रित ताकद आपल्यासाठी अडचणीची ठरणार होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावर पुन्हा निवड व्हावी, यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे येत्या काळातही त्यागाची तयारी ठेवा, हे सर्वांना यापूर्वीच सांगण्यात आले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा. त्यानंतर येणारा काळ आपलाच असेल, असे फडणवीस म्हणाले. आम्ही पक्ष फोडत नाही. मोंदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी सोबत येत असेल तर त्याला विरोध करु नका, त्यांचे स्वागत करा असे नमूद करताना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.