अमरावतीः अकोला जिल्ह्यात पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे मंदिराजवळील टिनाच्या शेडवर झाड पडून त्यात ७ जणांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे प्रसार माध्यमांशी (DCM Devendra Fadnavis on Paras Accident) बोलताना दिली. या घटनेत ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. काल ही घटना घडली. ही घटना अतिशय दुदैवी असून जखमींवर चांगल्या प्रकारे उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात आपली अकोला येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पारस येथील बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थान आहे. रविवारी सायंकाळी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी राहते. या मंदिराच्या बाहेर टिनाचे मोठे शेड आहे. पाऊस सुरु झाल्याने भावीकांनी शेडमध्ये आश्रय घेतला होता. सुमारे 40 ते 50 लोक शेडखाली आश्रयाला आले होते. त्याचवेळी अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मंदिराला लागून असलेले मोठे कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून मंदिराच्या टिनाच्या शेडवर कोसळले. त्यामुळे चाळीस ते पन्नास त्याखाली दबले. त्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर ३० ते ३५ भाविक जखमीी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेड खाली दबलेल्या असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळाला पोलिसांनी भेट देऊन मदतकार्य सुरु केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.