मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात अदानी प्रकरणावरून मतभेद उघड झाले असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीशी संबंधित वादावरूनही या दोन पक्षांमध्ये मतभेद उघड झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डिग्री (NCP & Thackeray divided over PM Modi digree issue) प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे गटाच्या भूमिकेला छेद दिला. “पंतप्रधान किती शिकले आहेत, यापेक्षा ते कसे काम करतात, याला महत्त्व आहेत. डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे नाहीत”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
अजित पवारांचेही समर्थन
यापूर्वी अजित पवार यांनी या मुद्यावर मोदींचे समर्थन केले होते. “2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिले का? मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच दिले पाहिजे. डिग्रीचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
अदानी प्रकरणी वेगळी भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणी वेगळी भूमिका मांडल्यावर ठाकरे गटात अस्वस्थता आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना वेळ मारून नेली. मात्र, यामुळे महाविकास आघाडीवर गंभीर संकट निर्माण झाल्याचे मानले जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिग्रीवरून लक्ष्य करण्याचे काँग्रेससह विरोधी पक्षाचे प्रयत्न सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्यावर घेतलेली वेगळी भूमिका साऱ्यांच्याच भुवया उंचावणारी ठरते आहे