नागपूर (NAGPUR) : युवक काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्धल केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (DCM Devendra Fadnavis on Statement on Savarkar) नागपुरात बोलताना प्रतिक्रिया दिली. “काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जर बिना तर्काचं किंवा बिना बुद्धीचे बोलले जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार” या शब्दात फडणवीस यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला.
आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या व युवक काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. आपल्या भाषणात वीर सावरकरांवर टीका करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. नागपुरात बोलताना फडणवीस यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा उद्या रविवारी नागपुरात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागलेले आहे.