मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

0

मुंबई (Mumbai) : मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात एटीएस ला यश आलेय (Fake Call to Mumbai Police). अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सध्या आझाद मैदान (Azad Maidan) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत तीन दहशतवादी शिरल्याच्या कॉलमुळे मुंबई पोलिसांची झोपच उडाली होती. चौकशीत आलेला फोन खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून खोटी माहिती देणाऱ्या यासीन सय्यद या इसमाला एटीएसने अटक केली आहे. त्याने पोलिसांना खोटा फोन करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. अटकेतील यासीन सय्यद (Yasin Syed) याच्या चौकशीतून नेमके कारण पुढे येईल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या आठवड्यात मुंबईत दहशतवादी घुसल्याची मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी आरोपीने दहशदवाद्याचे नावही सांगितले होते. मुजीब सय्यद नावाचा दहशवादी आला असून त्याचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांकही पोलिसांना दिला. या अनुषंगाने पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली असता फोनद्वारे मिळालेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले. यानंतर महाराष्ट्र एटीएसने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, यापूर्वीही पोलिसांना अनेक बनावट कॉल आले असून त्यात पोलिसांची तारांबळ उडाली आहे. नागपुरातही बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरविण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमुळे पोलिस यंत्रणा त्रस्त झाल्या आहेत. अनेकांनी दारुच्या नशेत असा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.