प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे निधन, संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासक हरवला

0

वर्धा: मराठीचे प्रसिद्ध समीक्षक डॉ.किशोर सानप यांचे आज रविवारी सकाळी अकरा वाजता निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर गत काही महिन्यांपासून नागपूरच्या निरामय या त्यांच्या मुलीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर दुपारी मानेवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. एक व्यासंगी समीक्षक म्हणून त्यांची साहित्य विश्वास ओळख होती.संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पांगुळवाडा या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने ते चर्चेत आले होते. त्यांनी गोंदिया येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

२०१७ ला उस्मानाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले होते. त्यानंतर या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूरच राहले. पुढे २०२३ मध्ये गुरुकुंज येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या डॉ.सानप यांनी स्वबळावर वाटचाल करीत साहित्य विश्वात नाव कमावले. वर्धेतील गो.से.वाणिज्य महाविद्यालय मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली. निवृत्ती नंतर ते नागपूरला वास्तव्यास गेले. तिथेच त्यांनी काही काळ लेखन केले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.