मुंबई : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांचे गाव राजगुरूनगर हे देशाचे ऊर्जा केंद्र व्हावे यासाठी शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) विधानसभेत केले. विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरुनगर येथील शिवराम हरी राजगुरू स्मारकाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर उत्तर देताना ते बोलत होते.
हुतात्मा राजगुरूंनी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्यासह स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांचे हे बलिदान देशातील युवकांना नित्य प्रेरणादायी राहिले आहे. म्हणूनच त्यांच्या स्मारकाबाबत शासनाने पुढाकार घेतला आहे, असे ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की या स्मारकाचा आराखडा पूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र त्या आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे. आता या स्मारकाबाबत स्थानिक आमदार आणि अशासकीय सदस्यांची एक समिती तातडीने तयार करण्यात येईल. या समितीच्या सूचनांचा अंतर्भाव करून येत्या दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, स्मारकासाठी या अगोदरही निधी देण्यात आला होता. पर्यटन विभागानेही ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. राजगुरुनगर हे राष्ट्रीय ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम शासन करेल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.