बाभुळगाव: ट्रक दुरुस्तीसाठी उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या प्रहार पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाचा धारधार शस्त्राने सपासप वार करीत निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा ही घटना बाभुळगाव तालुक्यातील मिटनापूर येथे घडली. अवघ्या एक तासातच घटनेचा उलगडा करीत बाभूळगाव पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे बाभूळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अनिकेत विलास गावंडे (30) रा. नेताजी चौक बाभूळगाव असे मृत नगरसेवकाचे नाव आहे. तर सदू उर्फ सादिक मुल्ला (27), गोलू उर्फ समीर मुल्ला (25), सोनू उर्फ आबिद मुल्ला (22) तिघेही रा. मिटनापूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपी सद्दू उर्फ सादिक मुल्ला व घटनेतील मृतक नगरसेवक अनिकेत गावंडे घटनेपूर्वी एकत्र राहायचे. काही दिवसांपूर्वी सद्दू उर्फ सादिक मुल्ला यांनी अनिकेत गावंडे यांच्याकडून ट्रक दुरुस्तीसाठी 21 हजार रुपये उसनवारीने घेतले होते. घेतलेली उसनवारीची रक्कम परत मागण्यासाठी रविवारी रात्रीच्या सुमारास अनिकेत मिटनापूर येथील सद्दू उर्फ सादिक मुल्ला यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात उसनवारीच्या पैशांवरून वाद निर्माण होऊन तो विकोपाला गेला. या वादात संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने छाती व मानेवर वार करून गंभीर जखमी केले. सोबतच लाथाबुक्क्यांनीही प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला त्याचा भाऊ शुभमने प्रथम बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून मयूर पिसे यांच्या ॲम्बुलन्सद्वारे यवतमाळ येथे पुढील उपचारार्थ नेत असताना वाटेतच अनिकेतचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी मृतकाचा भाऊ शुभम विलास गावंडे यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 302, 323, 504, 506, 34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनेतील तीनही आरोपींना अटक केली. घटनेचे गांभीर्य बघता मिटनापूर येथील घटनास्थळावर यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, यवतमाळ पोलिस उपविभागीय अधिकारी संपत भोसले व विशेष गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण परदेशी यांनी भेट देत घटनाक्रमाची माहिती घेतली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे, पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, अशोक गायकी, गणेश शिंदे, आशीष अवझाडे, संजय भुजाडे, सागर बेलसरे, पवन नांदेकर, रवी इरतकर करीत आहे.
बाभूळगावात कडकडीत बंद
एक वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील वॉर्ड क्रमांक एक मधून मृतक अनिकेत गावंडे निवडून आला होता. प्रहार पक्षाचा तो एकमेव नगरसेवक होता. अशातच रविवारी त्याच्या हत्येची वार्ता शहरात पसरताच काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर घटनेचा निषेध करण्यासाठी बाभूळगाव शहरातील बाजारपेठेत सोमवार, 13 मार्च रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अवैध रेतीव्यवसायाचे कनेक्शन चर्चेत
याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता हा खून रेतीच्या अवैध व्यवसायाच्या स्पर्धेमधून झाल्याचे सांगण्यात आले. दोघांकडेही रेतीसाठी वापरले जाणारे टिप्पर आहे. तालुक्यातील रेती इतरत्र नेण्याकरिता रात्रभर त्यांचे ट्रक सुरू असतात. बाभूळगाव तालुक्यात अवैध रेती व्यवसायातून गुन्हेगारी वाढली आहे. या रेती व्यवसायात मोठा नफा असल्याने श्रीमंती लवकर येते, असा समज असल्याने गुन्हेगारी, राजकीय क्षेत्रातील अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहे. अनिकेतही अशाच पद्धतीने वर आला होता, हे येथे उल्लेखनीय