अंगणवाडी सेविकांच्या मानधनात अखेर २० टक्के वाढ

0

मुंबईः अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढीची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मात्र, ही मानधनवाढ कमी असल्याचा दावा करीत विरोधकांनी सभात्याग (Anganwadi worker salary hike in Maharashtra ) केला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुरुवातीला दहा टक्के वाढ करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेऊन मानधनात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती लोढा यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी मानधनात सध्या महाराष्ट्र देशात सातव्या ते आठव्या स्थानी आहे. आता त्यात वाढ झाल्यानंतर महाराष्ट्र चौथ्या स्थानी येईल, असे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात अंगणवाडी सेविकांची २० हजार १८३ पदे रिक्त असून या पदांची भरती मे पूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. सध्या महागाई वाढली आहे. गॅस दर वाढले आहेत. अंगणवाडी सेविकांचे मानधन १५ हजार आणि मदतनीसांचे मानधन १० हजार करावे, अशी मागणी पवार यांनी केली. विरोधकांनी ही मागणी करत या मुद्यावरून सभात्याग केला. दरम्यान, अंगणवाडी सेविकांसाठी दीडशे कोटी रुपये खर्चून नवे मोबाइल खरेदी केले जाणार आहेत. अंगणवाड्यांचे भाडे एक हजारावरून दोन हजार रुपये करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील भाडेवाढीचा निर्णय लवकर घेणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात प्रायोगित तत्त्वावर कंटेनर अंगणवाडी सुरू करणार असून, पहिल्या अंगणवाडीचे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरु केल्या जाणार आहेत, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली