जिल्ह्यात ग्रामपंचायतनिहाय पाच वनराई बंधारे बांधण्यात येणार

0

 

-पाणी टंचाईवर मात शक्य

नागपूर NAGPUR  : जिल्हयात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय किमान पाच वनराई बंधाऱ्याचे बांधकाम 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे नियोजन आहे. जिल्हयात सुमारे तीन हजार बंधाऱ्यांचे बांधकाम करून जास्तीत जास्त नऊ हजार टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदशनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या जिल्हयात वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत असून पंचायत समिती मौदा अंतर्गत आदासा, बेर्डेपार व खराडा, पंचायत समिती सावनेर अंतर्गत रामपुरी व विधवा, कुही अंतर्गत साळवा, कळमेश्वर अंतर्गत वरोडा, काटोल अंतर्गत मेंडकी, नायगाव, व गॉडीदिग्रस, हिंगणा अंतर्गत वागधरा व गुमगाव, उमरेड अंतर्गत हळदगाव व पिपळा, कामठी अंतर्गत कढोली, पारशिवनी अंतर्गत चारगाव, बनपूरी, निया-1, पंचायत समिती नागपूर (ग्रामीण) अंतर्गत शिवा, धामणा, लिंगा येथे लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले असून उर्वरित प्रगतिपथावर आहेत.

वनराई बंधा-याचे बांधकाम करून ग्राम पातळीवर उपलब्ध पाणी साठा जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी 21 एप्रिल रोजी परिपत्रक काढले आहे. याअंतर्गत सन 2023-24 मध्ये नागपूर जिल्हयात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणुन ग्रामस्तरावर ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये असलेले नाले, नद्या, बंधारे व तलाव यामध्ये पाण्याच्या साठा वाढवून पाण्याचे जतन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी कच्च्या प्रकारचा बांधण्यात येणारा वनराई बंधारा महत्वाचा भाग पार पाडतो. त्यामुळे ग्राम पातळीवर चालु असलेल्या बांधकामामधून उपलब्ध झालेल्या सिमेंटच्या रिकाम्या थैल्या गोळा करुन त्यामध्ये श्रमदानाने लोक सहभागातून वाळू, माती, दगड भरून नाले किंवा ओढ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी वनराई बंधा-याचे बांधकाम करण्याचे नियोजित आहे.