लाच प्रकरणी एफएसएसएआय अधिकारी ताब्यात

0

नवी दिल्ली(New Delhi), 7 मे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सहाय्यक संचालक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय), प्रादेशिक कार्यालय, मुंबई आणि खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन व्यक्तींसह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये ठाणे स्थित एका खाजगी कंपनीचा संचालक, एक वरिष्ठ व्यवस्थापक आणि आणखी एक प्रतिनिधी यांचाही समावेश आहे. या खाजगी कंपनीची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी 1.20 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयने सहाय्यक संचालक (तांत्रिक विभाग) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये ठाणे स्थित खाजगी कंपनीचे संचालक आणि एक वरिष्ठ व्यवस्थापक, खाजगी कंपनी, आणि आणखी एक अज्ञात व्यक्ती यांचाही समावेश आहे. सहाय्यक संचालक एफएसएसएआय, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, हे अनेक मध्यस्थांच्या संगनमताने, सार्वजनिक सेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अप्रामाणिकपणा अन्न पदार्थ व्यवसायिक आणि इतर इच्छुकांकडून लाच मागणे आणि स्वीकारणे या बेकायदेशीर आणि भ्रष्ट पद्धतींमध्ये गुंतलेले आहेत अशा आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी अधिकाऱ्याने खाजगी कंपनीच्या आरोपी वरिष्ठ व्यवस्थापकाकडून लाच घेण्यास सहमती दर्शवली होती.

सीबीआयने सापळा रचून आरोपी सहाय्यक संचालक, एफएसएसएआय याला सदर वरिष्ठ व्यवस्थापक आणि खाजगी कंपनीच्या दुसऱ्या प्रतिनिधीकडून 1,20,000/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचेच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर खासगी कंपनीच्या आरोपी संचालकालाही अटक करण्यात आली.

आरोपींच्या कार्यालयात आणि निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे 37.3 लाख रुपये रोख रकमेच्या स्वरूपात तर सुमारे 45 ग्रॅम सोने आणि विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आढळली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 08.05.2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.