शासकीय विमानात पुन्हा बिघाड, शिंदे, फडणवीस, राठोड विमानतळावर अडकले

0

मुंबई : जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा समाजाच्या वतीने आयोजित महाकुंभात सहभागी होण्यासाठी मुंबईहून निघाण्याच्या तयारीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड या (Technical Snag in State Government Plane) नेत्यांना मुंबई विमानतळावर ताटकळत रहावे लागले आहे. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने ते दुरुस्त होण्यासाठी या नेत्यांना विमानतळावर प्रतीक्षा करावी लागत आहे. यापूर्वीही औरंगाबाद येथे विमानात बिघाड निर्माण झाल्याने या नेत्यांना विमानतळावर ताटकळत रहावे लागले होते. त्यावेळी त्यांना दौराच रद्द करावा लागला होता.

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या (Hindu Gor Banjara Community) वतीने गेल्या पाच दिवसांपासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून बजारा समाजाची एकजूट, व्यसनमुक्ती, धर्मांतरला विरोध आदी मुद्यांवर या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या महाकुंभाचा समारोप होणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, विमानात बिघाड निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर ते दुरुस्त होण्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना करावी लागत आहे. रस्ते मार्गाने वेळेत पोहोचण्याची शक्यता नसल्याने विमानाने जाण्यावाचून पर्याय नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर अभियंत्यांच्या नेतृत्वात विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचे तातडीचे काम सुरु आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा