
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मध्य व दक्षिण मध्य नागपूर भागात आयोजन
नागपूर(Nagpur), दि. 16 एप्रिल 2026 :
भगवान विष्णू यांचे सहावे अवतार मानले जाणारे भगवान श्री परशुराम यांनी अधर्माविरुद्ध लढा देत धर्मसंस्थापनेचे कार्य केले होते. या पराक्रमी क्षत्रिय योद्ध्याच्या स्मृतिंना उजाळा मिळावा व जनसामान्यामध्ये धर्माबद्दलचे जनजागरण करण्याच्या हेतूने भगवान श्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूरच्या वतीने दि. १९ एप्रिल रोजी भव्य स्कुटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य व दक्षिण मध्य भागातून प्रथमच अशा प्रकारची रॅली आयोजित केली जात असून, धार्मिक व सांस्कृतिक उत्साहाचे दर्शन या माध्यमातून घडणार आहे.
आग्याराम देवी मंदिर येथे संध्याकाळी ५ वाजता भगवान परशुरामाचे पूजन करून रॅलीला प्रारंभ करण्यात येणार आहे. रॅलीमध्ये भगवान परशुरामाचा आकर्षक रथ राहणार असून मंगलवाद्य, टाळकरी, यांचाही मोठा सहभाग राहणार आहे. ठिकठिकाणी जल्लोषात रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे.
रॅलीचा समारोप चौकोनी मैदान हनुमान नगर येथे सायंकाळी ७.३० वाजता होईल. यावेळी आमदार माननीय मोहनजी मते, आमदार प्रवीण जी दटके व भाजप नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर जी तिवारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष पराग जोशी, संयोजक तुषार पिदडी, सहसंयोजक श्रद्धा पाठक व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
रॅलीचा मार्ग:
रॅलीची सुरुवात आग्याराम देवी मंदिर येथून होईल. पुढे दत्त मंदिर, आसरा देवी मंदिर, श्री गणेश मंदिर, थाडेश्वरी राम मंदिर, जोशी यांचे राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिटणीस पार्क चौक, नागमुद्रणालय, राम भंडार, पंडित बछराज व्यास चौक (बडकस चौक), गजानन महाराज मंदिर, आयाचित मंदिर चौक, भोसला वेद शाळा, झेंडा चौक, भोला गणेश चौक, एसडी हॉस्पिटल चौक, संगम सिनेमा चौक, गजानन महाराज चौक (रेशिमबाग), स्मृती मंदिर चौक, केशव द्वार, महात्मा फुले सभागृह, क्रीडा चौक, बजाज चौक (हनुमान नगर) असा मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप हनुमान नगर मैदान येथे होणार आहे.




















