
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर आयुष्य बदलण्याची ताकद आहे, याची जिवंत साक्ष यंदाच्या निकालातून पुन्हा एकदा दिसून आली.
येनबोडी परिसरातील बल्लारपूर पब्लिक स्कूलने CBSE दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत, ग्रामीण आणि वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी मिळाल्यास ते किती मोठी झेप घेऊ शकतात, हे ठामपणे सिद्ध केले आहे.
शाळेची विद्यार्थिनी स्वीकृती सुभाष पुनेकर हिने 93.6% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, विशेष म्हणजे तिने इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. द्वितीय क्रमांक तमन्ना प्रशांत वासाडे (93%) हिने मिळवला, तर तृतीय क्रमांक तन्वी नितीश क्षीरसागर (92.6%) हिने मिळवला.
बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडी ही शाळा सुमारे 36 गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून, अत्यंत वाजवी शुल्कात CBSE पद्धतीचे दर्जेदार शिक्षण व शिस्तबद्ध वातावरण उपलब्ध करून देत आहे.
“जिथे इच्छा तिथे मार्ग” या म्हणीप्रमाणे, अत्यंत लहान खेड्यांतील आणि वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि संधी दिल्यास ते मोठे यश मिळवू शकतात, हे शाळेने कृतीतून दाखवून दिले आहे। इतर शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर हीच या यशामागची खरी ताकद आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे सर,व्यवस्थापक प्रो. मेघा शुक्ला तसेच प्राचार्या ज्योत्सना बाबुलकर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले असून, सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.






















