‘भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा

0

 

* मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा.
* आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले भव्य तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले होते. यावेळी खापरखेडा नगरी तिरंगामय झाल्याचे चित्र दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथील भव्य तिरंगा यात्रेत हजारो नागरिक तसेच भाजपा व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सामील झाले होते.

“पाकिस्तानने पहेलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्यावर भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्याचे शौर्य हे वाखाणण्यासारखे असून जगातील सर्वोत्कृष्ट असलेल्या भारतीय सैन्य दलामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, आपण सर्व सुरक्षित आहोत. आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या आवाहनानंतर खापरखेडा येथे सर्वपक्षीय नेते व जनसामान्यांनी जो अभुतपूर्व प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद इतर ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा दिसायला हवा जेणेकरून राष्ट्र प्रेमाची भावना आणि भारतीय सैन्यांप्रती आदर व्यक्त करता येईल. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. भारतीय सैन्याने जी मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे, ती अविस्मरणीय आहे. आजच्या या तिरंगा यात्रेत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यात राष्ट्रभावना प्रकर्षाने दिसली”, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी केले.

महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले. भारतीय सैन्यदलाप्रति त्यांनी आदराची भावना व्यक्त केली. आपला देश सुरक्षित हातात असून कुठल्याही अतिरेकी हल्ल्याला किंवा पाकिस्तानच्या सैनिकांना उत्तर देण्यास आपले भारतीय सैन्यदल समर्थ आहे, असे ते म्हणाले.

डॉ आशिषराव देशमुख प्रास्ताविक करताना म्हणाले, “भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तान नामोहरम झाला. भारतीय लष्कराच्या पाठीशी नागपूर जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी आहे. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. या तिरंगा यात्रेत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. खापरखेडा येथे या यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे, त्यातून भारतीय सैन्य दलाबद्दल असलेला विश्वास प्रामुख्याने दिसून येतो. भारतीय लष्कराला सलाम..”

या तिरंगा यात्रेत भाजपाचे आमदार चरणसिंग ठाकूर, डॉ राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रगती मंडल, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक व हजारोंच्या संख्येत नागपूर जिल्ह्यातील नागरिक तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते. या भव्य तिरंगा यात्रेने खापरखेडा व आजूबाजूचा परिसर पादाक्रांत केला. ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.