
Ajit Pawar: GBS हा आजार केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर, कोंबड्यांमुळे होतं असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
Guillain Barre Syndrome In Pune : पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असताना या जीबीएस (GBS) आजाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. GBS हा आजार दूषित पाण्यामुळे होतं असल्याचे या आधी सांगण्यात आलं होतं, तसा दावा देखील करण्यात आला होता. मात्र या आजाराचे संक्रमण होण्यामागे आणखी एक कारण समोर आले आहे.
GBS आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर, कोंबड्यांमुळे होतं असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले. तर कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आपल्याकडे खडकवासला भागात मधल्या काळात जे काही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस (GBS) चे रुग्ण आढळून आले. त्यात प्रथम दर्शनी असे वाटले होते की हा आजार पाण्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे होत आहे. मात्र खडकवासल्याच्या भागात काहींचे म्हणणे आहे की, कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झालाय. त्यामुळे मी या संदर्भात सविस्तर माहिती आता घेतली असून त्या बाबतीत माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. जिथे हा आजार आढळून आला आहे त्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे कारण नाही. पण कोंबड्यांचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे.असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे GBS ची लागण- अजित पवार
सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या मागे दूषित पाणी हे केवळ एक कारण नाही, तर कोंबड्यांचे कच्चे मांस खाणे हेदेखील एक कारण असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-
– अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
– अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
– जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
नागरिकांनी घ्यावयाची काळजी-
– पिण्याचे पाणी उकळून प्यावे
– स्वच्छ व ताजे अन्न खावे
– शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
– हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.