कोरोनानंतर एच३एन२

0

दोन – अडीच वर्षे साऱ्यांनीच अडचणींचा सामना केला. संपूर्ण देश अगदी घरात कोंडून राहीला. कधी नव्हे तो अर्थचक्रालाही ब्रेक लागला. सर्वांच्याच एकत्रीत प्रयत्नांमुळे कोरोनासारख्या संकटावर जगाने मात केली. चल-चल रे, तुला रे गड्या भीती कशाची, म्हणत सारे पुन्हा धडाडीने पुढे सरसावले. आता कुठे सर्व सुरळीत होते आहे. उणेपुरे वर्षभराचा कालावधी लोटला असताना आता एच३एन२ चे संकट उभे ठाकले आहेत. या व्हायरल इन्फेक्शनने तोंड वर काढत चिंता वाढविली आहे. आतापर्यंत हे सामान्य इन्फेक्शन असून, आजार सहजपणे बरा होत असल्याचे सांगितले जात होते. आता मात्र हा आजार जीवावर उठला आहे. अहमदनगरमध्ये या आजाराचा पहिला बळी नोंदविला गेला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २३वर्षीय तरुणाचा या आजारावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा देशातील तिसऱा तर राज्यातील पहिला एच३एन२ इन्फ्लूएन्झाचा बळी ठरला आहे. या नंतर प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. संसर्ग टाळण्यासाठी संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. नागपुरात ७८ वर्षीय रुग्णाचा याच आजाराने बळी गेल्याची शंका आहे. बुधवारी होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत मृत्यूच्या कारणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एकीकडे एच३एन२ इन्फ्लूएन्झाने टेंशन वाढविले असतानाच ‘कोरोना रिटर्न्स’मुळेही चिंता वाढली आहे. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १५५ नवे रुग्ण आढळून आलेत. सोमवारी आढळलेल्या प्रकरणांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. राज्यभरात सध्या ६६२ सक्रीय रुग्ण आहेत. एच३एन२ इन्फ्लूएन्झा आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा धडकी भरू लागली आहे. सुमारे वर्षभरापूर्वीच नाका- तोंडावरचा मास्क दूर झाला होता. नागरिकही मिळून मिसळून सणवार साजरे करू लागले होते. पण, आता पुन्हा मास्क वापरण्याच्या सूचनेसह गर्दीत जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.आरोग्यमंत्री तानाजी सांवंत यांनीसुद्धा खबरदारीचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. एकीकडे आजार बळावत आहेत. त्याचवेळी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी संपावर गेले आहेत. समपामुळे वैद्यकीय क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. गरिबांसाठी आशेचे केंद्र असणाऱ्या शासकीय रुग्णालयांमधील उपचारावर मोठा परिणाम झाला आहे. नागपुरातील मेडिकल, सुपर, मेयो, डागा रुग्णालयातील कामांवर मोठा परिणाम झाला आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये अवघ्या मध्य भारतीतील गंभीर आजारांचे रुग्ण उपचारासाठी येतात. मेयोतसुद्ध विदर्भातून रुग्ण उपचारासाठी येतात. पण, अत्यावश्यक रुग्ण वगळता इतरांना नंतर येण्यास सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयांमधून रुग्णांना आल्या पावली दुखणे सोबत घेऊनच परतावे लागत आहे. एकीकडे आजारांनी वाढविलेली धडकी, त्यात कर्मचाऱ्यांचा संप अशात आता नागरिकांनी स्वतःच स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.