
हिंदू शक्तीचा नृसिंह प्रगटला!
एक धक्का और दो !
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 7 |
30 ऑक्टोबर 1990 ची कारसेवा झाली आणि 2 नोव्हेंबर 1990 ला मुलायमसिंह यादव यांनी भीषण नरसंहार घडवल्या नंतर आता पुन्हा रामभक्त श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या भानगडीत तेवढ्या त्वेषाने पडणार नाहीत, असा केंद्र सरकारचा होरा होता.
पण त्या नरसंहारा नंतर उत्तर प्रदेशाने मुलायमसिंह यादव यांना सत्तेतून बाहेर फेकले होते. अयोध्या आंदोलनात सक्रिय भूमिका असलेले कल्याणसिंह उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाले होते. *कुठल्याही परिस्थितीत रामभक्तांवर गोळ्या चालवणार नाही, असे कल्याण सिंहानी स्पष्ट केले होते.* धर्माचार्यांनी आणि विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा अयोध्येत कारसेवा करण्याचे आवाहन केले. देशभर पुन्हा जनजागरण कार्यक्रम राबविण्यात आले.
६ डिसेंबर १९९२ ला पुन्हा कारसेवा करायचे ठरले. कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयूच्या काठची एकएक मूठ माती आणून टाकायची आणि आपला मंदिर निर्माणाचा संकल्प दृढ करायचा अशी संयोजकांनी योजना आखली होती. अशोकजी सिंहल, लालकृष्णजी अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, तेव्हाचे संघाचे सरकार्यवाह शेषाद्रीजी, आचार्य धर्मेंद्रजी, साध्वी ऋतंबराजी, साध्वी उमा भारतीजी, महंत नृत्यगोपालदास, महंत परमहंस रामचंद्रदास बाबा यांच्यासह असंख्य दिग्गज नेते, धर्मचार्य मंचावर आरूढ होते. विवादित स्थळाच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सभेला प्रारंभ झाला. काही वेळाने प्रातिनिधिक कारसेवा सुरू होणार होती.
सकाळी ११.४५ वाजे दरम्यान खा. प्रमोदजी महाजन यांचे भाषण सुरू असतानाच काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले. ‘मिट्टी नहीं खिसकाऐंगे, ढाँचा तोडकर जायेंगे’, ‘एक धक्का और दो, बाबरी ढाच्या तोड दो!’
पाहता पाहता शंभर एक कारसेवक आत घुसले. एका मागोमाग एक असे अनेक कारसेवक तीनही घुमटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळी, फावडे, सळाखा अशी खोदकामाची अवजारे आधीच दडवून ठेवली होती, तीही बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला, ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला. जय श्रीराम म्हणत कारसेवक बेधुंद झाले होते. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. मंचावरून सर्वांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. *मात्र, कारसेवक रामकार्यात तल्लीन झाले होते. हिंदू शक्तीचा नृसिंह पुन्हा एकदा प्रगटला होता. रामभक्त हनुमानाला आपल्या शक्तीचे स्मरण होताच त्याने रामकार्यासाठी समुद्रावर उड्डाण केले होते. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपल्या शक्तीचे स्मरण झाले होते.*
दुपारी २.४५ वाजे दरम्यान अचानक मोठा आवाज झाला आणि धुळीचा प्रचंड लोट आकाशाला भिडला! सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले. उजवी कडील घुमट कोसळला होता. ‘एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो’, या घोषणेने आसमंत दणाणून निघाले. ३.४५ वाजता डावीकडचा घुमटही अचानक कोसळला आणि ४.४५ वाजता शेवटचा धक्का बसला. *’सीयावर रामचंद्र की जय’ ‘जय श्रीराम’, ‘रामलला हम आये है, मंदिर यही बनायेंगे’ घोषणांनी आसमंत दुमदुमले. कारण मुख्य घुमटही जमीनदोस्त झाला होता ! ४६४ वर्षांची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती.*
*लक्षावधी रामभक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आपल्या राष्ट्रीय अस्मितेवर लागलेला परकीय आक्रमकाचा, बाबराचा कलंक पुसला गेला होता. अयोध्या आनंदली. मिठाईची सर्व दुकाने खोलली गेली ! अयोध्येत घरोघरी दिवे लागले. श्रीराम आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तेव्हा शरयुने अनुभवलेली दिवाळी पुन्हा एकदा 6 डिसेंबर 1992 ला ती पुण्यासलीला अनुभवत होती.*
बाबरी ढाचाच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता तेथील ढिगारे हलवून सपाटीकरणाचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले. एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. अश्वत्थाम्याच्या कपाळावरील भळभळत्या जखमेप्रमाणे ४६४ वर्षांपासून बाबराने लावलेल्या कलंकाची जखम भळभळत होती. संघटित हिंदू शक्तीने तो कलंक नष्ट करून श्रीरामजन्मभूमी वर प्रभू श्रीरामचंद्रांचे एक साधे, छोटेसे, तंबुतील पण पवित्र मंदिर उभे केले होते.
पाचवा हिंदू खांद्यावर घ्यायचा असेल तरच चार हिंदू एकत्र येतात, ही परिस्थिती श्रीरामजन्मभूमी आंदोलनाने बदलवली. रामभक्तांनी छद्म धर्मनिरपेक्षतेवर सूड उगवला. लांगुलचालनाच्या राजकारणाचा क्षोभ विवादित ढाचाची एकेक वीट काढताना व्यक्त केला. *लक्षावधी रामभक्तांच्या बलिदाना विषयीची ती कृतज्ञ कृती होती. ‘अब हिंदू मार नही खायेगा’ हा संदेश रामभक्तांनी दिला होता.*
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827