

जाणून घ्या यंत्रणेवरील ताण आणि वीज पुरवठ्याची अपरिहार्य तांत्रिक बाजू
नागपूर (Nagpur): वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी वीज कंपन्यांचे अधिकारी आणि तंत्रज्ञ २४ तास मैदानावर उतरून अविरत सेवा देत आहेत. उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत असल्याने तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. ही तात्पुरती अस्वस्थता विजेच्या तुटवड्यामुळे नसून, उन्हाळ्यात घरे, कार्यालये आणि व्यावसायिक ठिकाणी AC, कुलर्स व पंख्यांचा एकाच वेळी वापर वाढल्याने यंत्रणेवर ‘पीक डिमांड’चा प्रचंड ताण येतो.
नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यातील ४७० मेगावॅटची मागणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला ८०० मेगावॅटवर आणि आता थेट ९५० मेगावॅटच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या अफाट वाढीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घरी परतल्यावर स्थानिक ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) ओव्हरलोड होतात. बाहेरील उष्णता आणि अंतर्गत लोडमुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल कमालीचे गरम होऊन मोठे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा फ्यूज स्वतःहून उडतो (Fuse Blowing); हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज कर्मचारी रात्री-अपरात्रीही तत्परतेने काम करत असतात.
या तांत्रिक कारणांसोबतच एप्रिल-मे महिन्यातील अचानक येणारे वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मान्सूनपूर्व पावसामुळे झाडे कोसळून तारा तुटतात. अशा वेळी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी, ग्राहकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून वीज पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवून वादळ शमल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाते. याव्यतिरिक्त, आगामी पावसाळ्यात अखंडित सेवा मिळावी म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, नादुरुस्त इन्सुलेटर बदलणे आणि सबस्टेशनची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी ‘पावसाळा पूर्व नियोजित कामे’ (Pre-Monsoon Maintenance) केली जातात; भविष्यातील मोठे बिघाड टाळण्यासाठी हे पूर्वनियोजित शटडाऊन अत्यंत आवश्यक असतात.
दुसरीकडे, जिल्ह्याची वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने ६०२.९८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शहर मंडळातील ९ आणि ग्रामीण भागातील १२ मोक्याच्या ठिकाणी एकूण २१ नवीन अतिउच्च दाबाची (३३/११ केव्ही) उपकेंद्रे उभारली जात असून, ७ विद्यमान उपकेंद्रांची क्षमतावाढ केली जात आहे. ग्राहकांना सातत्यपूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी ४०५ नवीन ट्रान्सफॉर्मर्स, १५६ किलोमीटरची नवीन उपरी वाहिनी आणि ३०० किलोमीटरची अत्याधुनिक भूमिगत वाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय टाऊन डीपीआर अंतर्गत तब्बल ७८३ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, त्यात २४ नवीन उपकेंद्रे उभारणे, ८ उपकेंद्रात नवीन रोहित्र बसवणे, ४ उपकेंद्रातील रोहित्रांची क्षमतावाढ करणे यासह १४१.६ किमी लांबीची ३३ केव्ही उपरी, ४०७.१ किमी भूमिगत आणि १०३.५ किमी लांबीची ११ केव्ही उपरी व ३५०.५ किमी भूमिगत वीज वाहिनी उभारण्याच्या कामांचा समावेश आहे. एकूण १३८५ कोटींहून अधिक खर्चाच्या या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. उन्हाळ्यातील वीज खंडित होणे ही अपघात टाळणारी एक अपरिहार्य तांत्रिक प्रक्रिया असून हजारो कर्मचारी ग्राहकांसाठी २४ तास कार्यरत आहेत; त्यामुळे ग्राहकांनीही दुपारी आणि रात्रीच्या ‘पीक अवर्स’मध्ये विजेचा अपव्यय टाळून, जड उपकरणे गरजेनुसारच चालवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















