
नागपूर (Nagpur) एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन अंतर्गत वर्गीकृत केल्या गेलेल्या दैनंदिन कामकाजाचे सूचक विश्लेषण व स्वचालन प्रकल्प व्यवस्थापनात परिवर्तनात्मक क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत, असे मत भारतीय नौदलातील वरिष्ठ निवासी पर्यवेक्षक, कमांडर मीना पद्मनाभन यांनी व्यक्त केले.
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनने चिटणविस सेंटर, नागपूर येथे साप्ताहिक सत्रात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट: रेस अगेन्स्ट बजेट अँड टाइम’ या विषयवार त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
एआयचे तंत्र प्राधान्यक्रम आणि शेड्यूलिंगमध्ये मदत करणाऱ्या साधनांद्वारे प्रकल्प व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. उपलब्ध संसाधने आणि संबंधित डेटाच्या आधारे सुरुवातीपासूनच प्रोजेक्ट शेड्यूल तयार करून त्याला ऑप्टिमाइझ करण्यात एआय टूल्सची मदत होते, असे कमांडर पद्मनाभन यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे, ऑटोमेशन वेळ वाचवते आणि त्रुटी कमी करते. ते तंत्र योग्यरित्या अंमलात आणल्यास, ऑटोमेशन कार्यकारी चमूची उत्पादकता आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवू शकते, असे त्यांनी सांगितले.
पद्मनाभन यांनी भविष्यातील ट्रेंड जसे की मोबाईल ऍक्सेसिबिलिटी, प्रगत संपर्क साधने आणि पर्यावरणास अनुकूल व्यवस्थापन पद्धतींद्वारे केलेले रिमोट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डिजिटल ट्विन टेक्नॉलॉजी अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला. या सत्राचे सूत्रसंचालन निखिल शर्मा यांनी केले, अमोल गाडगे आणि फ्युचर फोर्जर्स टीमने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.