आम्ही जगायचं तरी कसं ? शेतकऱ्यांचा सरकारला आर्त सवाल

0

 

यवतमाळ – नेर तालुक्यातील सावरगाव काळे, मोझर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतशिवारात पेरलेली बियाणे मातीसकट खरडून गेली. त्यामुळे शेतकरी पुन्हा एका नवीन संकटात सापडले आहेत. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं तरी कसं, असा आर्त सवाल शेतकऱ्यांकडून सरकारला विचारला जात आहे.

सावरगाव काळे परिसरात शंभर हेक्टरच्यावर शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घारेफळ, टेंभी, सावरगाव काळे या परिसरात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे गावालगतच्या ओढ्याला पूर आला. शिरसगाव येथील धरणाच्या कालव्यात पावसाचे पाणी आल्यामुळे शेतात शिरले. सोबतच नाल्याचे पाणीही थोपल्यामुळे ते उभ्या पिकात ते पाणी शिरले. बांध फुटून शेतात केवळ दगड, मुरुमाचा मलबा शिल्लक राहिला आहे. दोनशे पेक्षा जास्त हेक्टरचे नुकसान झाल्याचा यात अंदाज आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करीत तात्काळ नुकसानीचा सर्वे करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.